ई- लर्निंग गेलं खड्ड्यात... माझं पोर असल्या उद्योगात पडणार नाही

शांताराम काळे
Thursday, 23 July 2020

ई- लर्निंग म्हणजे काय रे भाऊ म्हणत महादू गंगाड (खैरवाडी)ने सरकारलाच सवाल करत घरात खायला भाकर मिळणं मुश्किल झालंय त्यात पोराला मोबाईल कुठून घेऊन द्याचा? तुमचं ई- लर्निंग गेलं खड्ड्यात माझं पोर असल्या उद्योगात पडणार नाही.

अकोले (अहमदनगर) : ई- लर्निंग म्हणजे काय रे भाऊ म्हणत महादू गंगाड (खैरवाडी)ने सरकारलाच सवाल करत घरात खायला भाकर मिळणं मुश्किल झालंय त्यात पोराला मोबाईल कुठून घेऊन द्याचा? तुमचं ई- लर्निंग गेलं खड्ड्यात माझं पोर असल्या उद्योगात पडणार नाही.

सरकार खावटी देईना त्यामुळे उपासमार होतेय. त्यात शाळेत येऊ नका पण मोबाईल घ्या, असं सांगितले जात आहे. शेळ्या मेंढरं वळल पण तुमचं हे महागाच शिक्षण नको, आदिवासी भागातील पालकांची ही प्रातिनिधिक भूमिका आहे.

शाळा बंद आहेत, शिक्षक विद्यार्थी गोळा करण्यासाठी पालकांच्या दारात आहेत. मुलांना घरीच राहू द्या, त्यांना इ लर्निंग पद्धतीने शिक्षण देऊ. फक्त मोबाईल पाहिजे पण हा मोबाईल किमान सात हजार रुपयांचा कोरोनामूळे रोजगार नाही. शेती करावी तर मजूर नाही मजूर मिळाला तर त्याला मजुरी द्यायला पैसे नाही. घरात सात माणसे त्यात तीन पोरं शाळेत.

त्यातील दोन आश्रम शाळेत एक माध्यमिक शाळेत महादूला दीड एकर क्षेत्र तेही पावसाळ्यात पिकते. इतर आठ महिने मजुरी तीही नारायणगावाला, त्यात ही नवीन शिक्षण पद्धती, त्यामुळे शिक्षण नको पण मोबाईल मागू नको, अशी आदिवासी पालकांची मानसिकता आहे. अतिदुर्गम भागात नेटवर्क नसल्याने रेंज नाही. सगळेच अडचणीचे ठरत असल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थी अडचणीत आहेत.

नुकतीच राजूर येथे तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत सरपंच यांची समिती स्थापन झाली. त्यात त्यांनी पहिला ठराव सरकारने मुलांना मोबाईल व आदिवासी भागात टॉवर्स उभारून द्यावेत, अशी एकमुखी मागणी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger among tribal parents over e-learning education in Akole taluka