esakal | डोंबिवलीतील बँक खातेदाराचे पैसे काढले नगरमध्ये, आरोपी निघाला पुण्याचा

बोलून बातमी शोधा

Arrested for withdrawing money with fake signature

खातेदारांची वरीलप्रमाणे फसवणूक करणाऱ्या अशोक शिवाजी गाढवे (रा. चांदूस, ता. खेड, जि. पुणे) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. 

डोंबिवलीतील बँक खातेदाराचे पैसे काढले नगरमध्ये, आरोपी निघाला पुण्याचा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः बॅंकेत येणाऱ्या ग्राहकाची सही व खाते क्रमांकाचे छायाचित्र घेऊन, त्याच बॅंकेच्या दुसऱ्या शाखेत जाऊन संबंधिताच्या खात्यावरून बनावट सहीने पैसे काढणाऱ्या ठकास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

खातेदारांची वरीलप्रमाणे फसवणूक करणाऱ्या अशोक शिवाजी गाढवे (रा. चांदूस, ता. खेड, जि. पुणे) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. 

डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेची शहरातील लाल टाकी भागात शाखा आहे. या बॅंकेचे खातेदार अल्ताफ शेख यांच्या खात्यातून बनावट सही करून पैसे काढण्याचा प्रकार एकाने केला. बॅंक कर्मचाऱ्याने खातेदाराच्या सहीची पडताळणी केली तेव्हा तफावत आढळून आली.

त्यानंतर संबंधिताला कुठलाही सुगावा लागू न देता हा प्रकार शाखाधिकारी बयाजी सुभाष चव्हाण (वय 51) यांच्या कानावर घातला. चव्हाण यांनी तातडीने तोफखाना पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. तेथील सहायक पोलिस निरीक्षक इडेकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फौजफाट्यासह ते बॅंकेत दाखल झाले.

संबंधित व्यक्‍तीकडे विचारपूस केली असता तो दिव्यांग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला लेखी प्रश्‍न विचारून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने आपले नाव अशोक शिवाजी गाढवे (रा. चांदूस, ता. खेड, जि. पुणे) असल्याचे सांगितले. 
बॅंकेचे व्यवस्थापक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी अशोक गाढवे याच्याविरुद्ध फसवणूक करणे, तसेच बनावट कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, गाढवे याने ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथेही अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्याने असे प्रकार कोठे-कोठे केलेले आहेत, त्याचे साथीदार कोणी आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

शिक्षण नसतानाही त्याचा ठकविण्याचा धंदा 
दुसऱ्यांच्या खात्यासह स्वाक्षरीचे छायाचित्र काढून मग पैसे लाटण्याचा उद्योग करणाऱ्या अशोक गाढवे याचे शिक्षण अवघे आठवीपर्यंत झाले आहे. मात्र, तंत्रज्ञानात तो पटाईत आहे. तो करीत असलेली फसवणूक पाहून बॅंक कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही चक्रावले होते.