esakal | पुण्याचे सहायक आयुक्त नगरला आले वारकऱ्यांच्या वेशात, नाठाळ कर्मचाऱ्यांच्या माथी हाणली काठी

बोलून बातमी शोधा

Assistant Commissioner of Pune Division in the guise of Warkari}

शेजारी चौकशी केली, तर ते चहापानास गेल्याचे सांगण्यात आले. अखेर हा वारकरी खऱ्या रूपात प्रकट होताच सगळ्यांचीच तंतरली. कारवाईच्या भीतीने अनेकांनी थेट त्यांचे पायच धरले. 

पुण्याचे सहायक आयुक्त नगरला आले वारकऱ्यांच्या वेशात, नाठाळ कर्मचाऱ्यांच्या माथी हाणली काठी
sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

नगर : कपाळावर भगवा टिळा, अंगात धोतर, नेहरू शर्ट, पायात कोल्हापुरी, तोंडाला मास्क, अशा पेहरावात एक वारकरी धर्मादाय उपायुक्त कार्यालयात आला. धार्मिक संस्थेसाठी विचारणा करू लागला; पण अनेक कर्मचारी जागेवर नव्हते. शेजारी चौकशी केली, तर ते चहापानास गेल्याचे सांगण्यात आले.

अखेर हा वारकरी खऱ्या रूपात प्रकट होताच सगळ्यांचीच तंतरली. कारवाईच्या भीतीने अनेकांनी थेट त्यांचे पायच धरले. काहींना समज देत, तर काहींवर कारवाई करताना या अनोख्या "वारकऱ्या'ने नाठाळ कर्मचाऱ्यांना चांगलेच वठणीवर आणले... 

वारकऱ्याच्या वेशात आले होते ते पुणे विभागाचे सहायक आयुक्‍त सुधीर बुक्के. जिल्ह्यातील धार्मिक देवस्थाने, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांना धर्मादाय उपायुक्‍त कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यासाठी सावेडीतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत धर्मादाय उपायुक्‍त कार्यालय आहे.

संपूर्ण जिल्ह्यातून येथे रोज अनेक जण येत असतात. कोणी कामानिमित्त आले, की कार्यालयातील कर्मचाऱ्यांना "चहा'ची तलफ होते. संबंधित व्यक्‍तींसमवेत मग "चहा' घेण्यासाठी ते बाहेर जातात. त्यातच कधी तासभर, तर कधी अर्धा तास "टाइमपास' होतो. त्यानंतर दुसरे कोणी आले, तर हे कर्मचारी जागेवर सापडत नाहीत. एखाद्या कामासाठी सामान्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. 

पुणे विभागाचे सहायक आयुक्त बुक्के यांनी वारकऱ्याच्या वेशात येऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. त्या वेळी अनेक कर्मचारी नेहमीप्रमाणेच जागेवर आढळले नाहीत. चौकशीत हे कर्मचारी चहासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. जेवणाच्या सुटीनंतरही तासभर कर्मचारी जागेवर नव्हते. बुक्के यांनी सकाळपासून दुपारपर्यंत या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली. नाठाळ कर्मचाऱ्यांची यादी तयार केली. वारकऱ्यांच्या वेशात असल्याने त्यांना कोणी ओळखलेही नाही. 

कर्मचाऱ्यांनी धरले "वारकऱ्या'चे पाय 
वारकऱ्याच्या वेशात आलेले सहायक आयुक्त बुक्के हे मूळ रूपात येताच अनेकांची भीतीने गाळण उडाली. बुक्के यांनी कार्यालयाच्या दालनात एकेका नाठाळ कर्मचाऱ्यास बोलावून कडक शब्दांत धुलाई केली. कर्मचाऱ्यांनीही प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देत, कारवाई न करण्यासाठी दयेची याचना केली. पुन्हा अशी चूक होणार नाही, असे सांगितले. बुक्के यांनी काही कर्मचाऱ्यांना एका चुकीसाठी माफ करताना, काहींवर कारवाई सुरू केली आहे. पुन्हा कामात ढिलाई झाल्यास कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.