नगर जिल्हा परिषदेच्या शाळेत मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

गौरव साळुंके
Sunday, 8 November 2020

गळनिंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनोळखी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील गळनिंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनोळखी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी शुक्रवारी रात्री शाळेच्या रेकॉर्ड रुमसह कॉम्प्यूटर लॅबच्या खिडक्‍यांचा कडी कोयंडा तोडुन खोल्यात प्रवेश केला.

रेकॉर्ड रुममध्ये उचकापाचक करुन तोडाफोड केली. दरम्यान, चोरट्यांनी कॉम्प्युटरची वायरिंग तोडली. त्यामुळे शाळेतील इलेक्‍ट्रॉनिक साहित्याचेही नुकसान झाल्याचे शालेय व्यवस्थापन समितीने सांगितले. 

शालेय परिसरात असा चोरीचा प्रकार सलग तिसऱ्यांदा घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे खोडसाळपणा की, चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरटे शाळेत गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शाळेत तीन वेळा चोरीचा प्रकार घडल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. सदर चोरीचा प्रकार मुख्याध्यापिकांना सकाळी शाळेत गेल्यावर लक्षात आल्याचे समजते. त्यांनी तातडीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांना माहिती देऊन याप्रकरणी कोल्हार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt of midnight robbery at Nagar Zilla Parishad school