
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणूकीत काही गावात सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली.
पारनेर (अहमदनगर) : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणूकीत काही गावात सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
देशात लोकशाही यावी यासाठी नव्वद वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची असे त्यांचे स्वप्न होते. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे असेही हजारे यांनी म्हटले आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशात लोकशाही यावी यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान केले त्यांची बलिदान व्यर्थ गेले की काय तसेच 70 वर्षात लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय असेही म्हटले आहे?
पंचायत राज मजबूत व्हावे यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च स्थान आहे. ग्रामसभा ही गावची संसद असून ग्रामपंचायत एक्सिकटिव्ह बॉडी कार्यकारी मंडळ आहे. या दोनही घटकांनी एक दुसऱ्यांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबुत करावयाची आहे. कारण आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडूण पाठविते. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असणारे चारित्र्यशील उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून पाठवायचे आहेत.
ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी लोक त्या पवित्र मंदीरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभांनी हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे की दिल्लीची संसद लोकसभा किंवा राज्याची संसद विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदीरे आहेत. त्यांचे पावित्र्य राहण्यासाठी ग्रामसभा, ग्रामपंचायत यांची फार महत्वाची जबाबदारी आहे. कारण ग्रामसभा ही सार्वभौम असून स्वयंभू आहे. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे हा लोकतंत्राचा लिलाव आहे. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे.
हेही वाचा : त्रास सुरू झाल्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ; नगर झेडपीतच प्रथमोपचार केंद्र सुरु करण्याची मागणी
ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने अविरोध निवडणूक करून निवडणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो.
नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही शेवटी प्रसिद्धी पत्रकात हजारे यांनी व्यक्त केली आहे.
संपादन : अशोक मुरुमकर