esakal | ग्रामीण भागात वाढतेय पर्यावरण रक्षणाची चळवळ; मृत्यूपश्चात शेतात रक्षाविसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

Awareness of environmental protection in Sangamner taluka

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातही जलप्रदुषणासारख्या मानवी जीवनाला विघातक आळा घालण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत.

ग्रामीण भागात वाढतेय पर्यावरण रक्षणाची चळवळ; मृत्यूपश्चात शेतात रक्षाविसर्जन

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातही जलप्रदुषणासारख्या मानवी जीवनाला विघातक आळा घालण्यासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. मानवी भावभावनांशी थेट संबंध असलेल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या अस्थिरक्षेचे विसर्जन इतरत्र न करता शेतात करुन त्यावर वृक्षारोपण केले जात आहे.

मानवी स्वभावाला असंख्य कंगोरे असतात. घरातील प्रिय व्यक्ती, आप्तेष्ट अथवा जीवलगाचा मनाला चटका लावून जाणाऱ्या मृत्यूने मानवी भावनांचा कल्लोळ उठतो. त्या व्यक्तीच्या शरिराची ऱाख नदीपात्रात विसर्जीत न करता, त्या रक्षेचे आपल्या शेतात विसर्जन करुन, त्यातील खड्ड्यात आपल्या आवडत्या व्यक्तिच्या नावाने वृक्षारोपण करुन त्याची स्मृती जपण्याकडे ग्रामीण भागातील जनतेचा कल वाढत आहे. 

अंत्यसंस्कारानंतर अस्थि व रक्षा नदी अथवा ओढ्याच्या प्रवाही पात्रात किंवा थेट कायगावटोका येथील प्रवरासंगमात विसर्जीत करण्याची हिंदू धर्मियांत परंपरा आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावातील अस्थि व रक्षा प्रवरापात्रात विसर्जित करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये यामुळे नदीपात्राचे होणारे प्रदुषण व त्याचा मानवी जीवन तसेच जलचरांवर होणारा परिणाम याबाबत सजगता आल्याने, ही धर्म व भावनांशी निगडीत प्रक्रिया टाळली जात आहे. 

तालुक्याच्या तळेगाव पट्ट्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी देवस्थानचे महंत कोंडाजी झुरळे यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अस्थिरक्षेवर परिसरातच वृक्षारोपण करण्यात आले. या कृतीचा परिणाम म्हणून अनेक कुटूंबांनी याप्रमाणे स्मृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकतेच तळेगाव दिघे येथील शिक्षक दत्तात्रेय दिघे व नान्नज दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाचे शिक्षक संजय सुखदेव वाघ (वय 45) यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटूंबांनी अंत्यसंस्कारानंतर रक्षा शेतात विसर्जीत केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फळझाडांचे रोपण केले आहे. ही झाडे पुढील आयुष्यभर आपल्या प्रियजनांना मधुर फळे व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणार आहेत. यातून या दोन्ही परिवाराने पर्यावरणाचा चांगला संदेश कृतीतून दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top