केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर आम्ही अण्णांच्या मागे उभे राहू

Bachchu Kadu meets Anna Hazare in Ralegan Siddhi
Bachchu Kadu meets Anna Hazare in Ralegan Siddhi

राळेगण सिद्धी :  शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. पण आंदोलन मागे घेतले म्हणजे ते थांबलेले नाही. केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या आंदोलनाच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहू, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी शनिवारी ( ता. ३० ) राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन एक तास राज्यातील शेतीप्रश्नांविषयी हजारे यांच्याशी चर्चा केली.

या वेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शरद जोशी शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, सुरेश पठारे, दत्ता आवारी, संदिप बामदळे, विकास गटकळ, हरिचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर हजारे यांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर उर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. राज्य, जिल्हा बदलला की शेतीचे प्रश्न बदलतात.

खिनखिनी गावात अनोखा प्रयोग

पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतक-यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमी भाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प मी केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.

बच्चू कडूंच्या प्रचाराला गेलो होतो

नगर येथील प्रहार अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांना तसेच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हजारे म्हणाले, समाजासाठी चांगलं काम करणारी जी काही माणसे आहेत. त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. पण बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो.

केंद्रीय मंत्र्यांना पाठवले

अण्णा हजारे यांच्या पत्राची दखल न घेणा-या केंद्र सरकारने केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीत पाठविले. शेतक-यांच्या प्रश्नांसह इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. थोडा विश्वास ठेवावा लागतो. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात, यावर माझा विश्वास आहे, असे कडू म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com