
साईमंदिर दर्शनासाठी खुले झाल्यापासून आजवर अठरा लाख भाविकांनी सुखरूप दर्शन घेतले.
शिर्डी ः कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून साईमंदिरातील नित्याची काकडआरती व रात्री नऊनंतर होणारी शेजारती यापुढे भाविकांविना होणार आहे. दर गुरुवारी निघणारी बाबांची पालखी मिरवणूक बंद करण्यात येणार आहे. ऑफलाइन दर्शन पास बंद ठेवले जातील, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी काल (मंगळवार) पत्रकारांशी बोलताना दिली.
बगाटे म्हणाले, ""जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशान्वये रात्रीच्या संचारबंदीस बाधा येऊ नये, तसेच भाविकांची गर्दी होऊ, नये यासाठी हे तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत. भाविकांनी शक्यतो साईदर्शनास येताना दर्शन व आरतीसाठीचे ऑनलाइन आरक्षण करूनच शिर्डीत यावे. गुरुवार, शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवशी येथील बायोमेट्रिक दर्शन पास सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. साईमंदिर दर्शनासाठी खुले झाल्यापासून आजवर अठरा लाख भाविकांनी सुखरूप दर्शन घेतले. प्रसादालयातदेखील शारीरिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''
या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखापाल बाबासाहेब घोरपडे, डॉ. आकाश किसवे आदी उपस्थित होते. अहमदनगर
कोविड नियमांचे पालन करून एका तासाच्या कालावधीत सुमारे नऊशे व दिवसभरात पंधरा हजार भाविक साईदर्शन घेतात. त्यामुळे आगामी काळातही दिवसभरात फक्त 15 हजार भाविकांनाच दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करूनच भाविकांनी शिर्डीत यावे.
- कान्हूराज बगाटे, सीईओ, साई संस्थान , अहमदनगर