कापूरवाडी तलावात भरलं पक्षी संमेलन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

सकाळी पावणेसात वाजता कापूरवाडी तलावातील पाण्यावरची धुक्‍याची चादर हळूहळू अस्पष्ट होत होती. शेकडो लहान-लहान बदके दिसू लागली.

नगर ः पहाटेच्या बोचऱ्या थंडीत कापूरवाडी तलावाच्या परिसरात आज 150 नगरकर एकत्र जमले. कारण होते राज्य सरकारने घोषित केलेल्या पहिल्या पक्षी सप्ताहाचे.

5 ते 12 नोव्हेंबर हा आठवडा "पक्षी सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचे औचित्य साधत नगरच्या निसर्ग मित्र मंडळ व स्वागत अहमदनगरतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी पावणेसात वाजता कापूरवाडी तलावातील पाण्यावरची धुक्‍याची चादर हळूहळू अस्पष्ट होत होती. शेकडो लहान-लहान बदके दिसू लागली. सूर्य जसा वर येऊ लागता तसा उपस्थितांचा आनंद वाढत होता. बगळ्यांचे व लहान पाणकावळ्यांचे थवे दिसेनासे झाले. तेवढ्यात भोरड्यांचा थवा पाहिल्याचेही सांगण्यात आले. 

इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी कापूरवाडी तलावाचा इतिहास सांगितला. निसर्गमित्र मंडळाचे संस्थापक पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी जिल्ह्याचा ब्रिटीश कालिन निसर्ग इतिहास सांगितला. कापूरवाडी तलाव आणि परिसरात सहज दिसणाऱ्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांविषयी, त्यांच्या वर्तणुकी विषयी माहिती दिली. 

पक्षी निरीक्षणात वेडा राघू, खंड्या, शिंजीर, कवड्या शेला, पारवा, टिटवी, बुलबूल या पक्ष्यांसह पाणडुबी बदक, चांदवा, लालसरी यासह लडाखहून स्थलांतर करून आलेले चक्रवाक बदक मोठ्या संख्येत दिसून आले.

गाय बगळे, वंचक, शराटी, राखी बगळा यांच्या सोबतच दलदल ससाणाही उपस्थितांना सुखावून गेला. परतीच्या मार्गावर "पावश्‍या' या पक्ष्याच्या जोडीनेही दर्शन दिल्याने कार्यक्रमाची सांगता झाली. निसर्ग अभ्यासक बहिरनाथ वाकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird gathering at Kapurwadi lake ahmenagar news