esakal | भाजपने अण्णा हजारे यांना लिहीले पत्र; म्हणाले दिल्ली वाचवा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP has sent a letter to Anna Hazare demanding agitation in Delhi

दिल्लीतील भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना पत्र लिहिले आहे.

भाजपने अण्णा हजारे यांना लिहीले पत्र; म्हणाले दिल्ली वाचवा

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : दिल्लीतील भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आदेश गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, अण्णा हजारे यांनी पुन्हा दिल्लीत परत यावे व गैरव्यहवाराविरोधात आवाज उठवावा.

आदेश गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे की, आम आदमी पार्टी भ्रष्टाचारात सामील आहे. तुम्ही दिल्लीत येऊन हे लोकांना सांगा. तुमच्या नेतृत्वात ‘आप’ने गैरव्यहवाराविरोधात आवाज उठविला होता. आज तोच पक्ष स्वतः त्यात सहभागी झाला आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, ५ एप्रिल २०११ ला तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी व जनलोकपाल विधेयकासाठी त्यावेळच्या सरकारविरूद्ध उपोषण केले होते. 

तुमच्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातील कोट्यावधी नागरिकांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर तुमच्याच नावाने काहींनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेची बाजू मांडत, निवडणुका लढवल्या. त्यातून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापना केली. 

अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात गुप्ता यांनी असेही म्हटले की, सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्राध्यापक आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर या नावांची यादी लांबलचक आहे.

खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना आपने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागला. अण्णा हजारे यांना पुन्हा दिल्लीत परत यावे आणि गैरव्यहवाराविरोधात आवाज उठवावा. या आंदोलनात भाजपला पाठिंबा द्यावा, अशी विनंती गुप्ता यांनी केली आहे.

loading image
go to top