esakal | नगरमध्ये सभापतीपदावरून महाविकास आघाडीचा पुन्हा होणार विचका?
sakal

बोलून बातमी शोधा

BJP will be the chairman of Ahmednagar Municipal Corporation

सभापतिपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक आहेत. ते आमदार जगताप यांचेही विश्‍वासू समजले जातात. शिवसेनेकडून विजय पठारे, श्‍याम नळकांडे यांची नाव चर्चेत आहे. सभापतिपदासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते महाविकास आघाडीतील नेत्यांना साकडे घालत आहेत.

नगरमध्ये सभापतीपदावरून महाविकास आघाडीचा पुन्हा होणार विचका?

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व बसपच्या मदतीने सत्ता मिळविली; मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार आहे. ही महाविकास आघाडी स्थानिक पातळीवरही दिसेल, अशा आणाभाका तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्या होत्या. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतिपद युतीला मिळते की महाविकास आघाडीला, हे दोन दिवसांत ठरणार आहे. 

भाजपने महापालिकेत सत्ता घेताना, बसपचे मुदस्सर शेख यांना एक वर्षासाठी स्थायी समितीचे सभापतिपद दिले. त्यानंतर प्रशासकीय पेच निर्माण झाल्याने, शेख यांनी दीड वर्ष हे पद उपभोगले. स्थायी समितीच्या सभापतींची निवड व्हावी, अशी मागणी होत होती. मात्र, लॉकडाउनमुळे निवड होत नव्हती. अखेर स्थायी समितीतील रिक्‍त आठ पदे भरून विभागीय आयुक्‍तांना निवडीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार विभागीय आयुक्‍तांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्‍त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवारी (ता. 25) स्थायी समितीचा सभापती ऑनलाइन निवडणुकीतून निवडला जाईल. 

सभापतिपदासाठी भाजपचे मनोज कोतकर इच्छुक आहेत. ते आमदार जगताप यांचेही विश्‍वासू समजले जातात. शिवसेनेकडून विजय पठारे, श्‍याम नळकांडे यांची नाव चर्चेत आहे. सभापतिपदासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते महाविकास आघाडीतील नेत्यांना साकडे घालत आहेत. त्यामुळे जगताप मित्रत्वाला जागतात, महाविकास आघाडीचा धर्म पाळतात, की आणखी काही वेगळा निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. महापौर व विरोधी पक्षनेतेपद सावेडीत आहे; मात्र स्थायीचे सभापतिपद केडगावला मिळण्याची शक्‍यता आहे. 

पुन्हा नगरमुळे लक्ष्यवेध

राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने त्यांचा त्यांचा उमेदवार रिंगणात उतरविल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो. भाजपची काँग्रेस, बसपा आणि इतर मतदारांवर भिस्त आहे. भाजपचा सभापती झाल्यास महाविकास आघाडीत पुन्हा राज्यपातळीवरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारनेरमधील नगरसेवकांना पुन्हा शिवबंधन बांधावे लागले होते.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image