भाजप कार्यकर्त्यांची स्वत:च्या घरासमोर आंदोलने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत नगर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरासमोर आंदोलन केले. "मेरा आंगण, मेरा रणांगण'चे फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला. लोणीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जामखेडमध्ये माजी मंत्री राम शिंदे, कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते, अकोल्यात पिचड पिता-पुत्रांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका 

शिर्डी : कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार, तसेच जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्यात तिन्ही मंत्री अपयशी ठरले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढते आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

लोणी येथे विखे पाटील यांच्या पुढाकारातून भाजपतर्फे "महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले. राहात्यात नगराध्यक्ष ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा, शिर्डी येथे नगराध्यक्ष अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते व भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, पिंपळस येथे नितीन कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले. 

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ""राज्यात रुग्णांची संख्या 41 हजारांवर गेली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोचवू शकले नाही. केंद्रीय समितीने 76 हजार बेडची उपलब्धता करण्याची सूचना सरकारला केली होती; परंतु आघाडी सरकार फक्‍त तात्पुरत्या उपाययोजना करीत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्‍टर, नर्स आणि पोलिस दलापर्यंत पोचली नाहीत. उलट पोलिसांवर हल्ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्‍त बघ्याची भूमिका घेतली.'' 

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. हे सरकार जनतेत दिसण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अधिक दिसते. फक्‍त फेसबुकवर संवाद साधते. या सरकारचे आपत्ती व्यवस्थापन केवळ अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या आंदोलनावर केलेल्या टीकेवर विखे पाटील म्हणाले, की कॉंग्रेसचे अस्तित्वच आता कुठे दिसत नाही. 

अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन 

अकोले : कोरोना संकटात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपच्या तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी घरासमोरील अंगणात आंदोलन केले.

माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे आंदोलन केले. भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंत आभाळे यांनी काळे मास्क लावून आंदोलन केले. वीरगाव येथे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, विठे येथे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी काळे मास्क लावून आंदोलन केले. 

कळस येथे भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी आंदोलन केले. भाजपचे शाखाध्यक्ष कारभारी वाकचौरे यांच्या अंगणात आंदोलन केले. सीताराम वाकचौरे, भाजयुमोचे ज्ञानदेव निसाळ, गोरख वाकचौरे आदी उपस्थित होते. दंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. उंचखडक बुद्रुक येथे राहुल देशमुख, अकोले येथे मच्छिंद्र चौधरी, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष सलीम पठाण, शेतकरी आघाडीचे दत्ता ताजणे, भाजपचे चिटणीस माधव ठुबे यांनी हिवरगाव येथे, तर मच्छिंद्र पानसरे यांनी वाशेरे यांनी अंगणात काळे कपडे परिधान करून आंदोलन केले. 

bjp

श्रीगोंदे : राज्य सरकारविरोधात आंदोलन करताना आमदार बबनराव पाचपुते. समवेत कार्यकर्ते. 

श्रीगोंद्यात सरकारविरुद्ध घोषणाबाजी 

श्रीगोंदे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसल्याने आज भाजप नेते आमदार बबनराव पाचपुते यांनी मोजक्‍या सहकाऱ्यांसह शहरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. 

पाचपुते यांनी निषेधाचा काळा झेंडा हाती धरला. पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, दत्ता जगताप यांनी निषेधाचे फलक घेतले होते. कोरोना रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याने पाचपुते यांनी घोषणा दिल्या. सुरक्षित अंतर, तोंडाला मास्क आणि जमावबंदी आदेशाचे पालन करीत हे आंदोलन झाले. 

bjp

कोपरगाव : सरकारविरोधात आंदोलन करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे. समवेत कार्यकर्ते. 

कोरोनाच्या संकटामध्ये सरकार अपयशी : कोल्हे 

कोपरगाव : कोरोनाच्या संकटात आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शहर व तालुका भाजपतर्फे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आज निषेध आंदोलन केले.

भाजपचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, वैभव आढाव आदी उपस्थित होते. सर्वांनी काळे मास्क परिधान केले होते.

कोल्हे म्हणाल्या, की कोरोना संकटात बाराबलुतेदार अडचणीत सापडला. शेतकरी हवालदिल झाला. श्रमिक मैलो न मैल पायी चालत गेले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शासनात समन्वयाचा अभाव आहे. तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना, 15 दिवसांपूर्वी बाजारपेठ सुरू करण्याची मागणी केली होती. त्यास पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, स्थानिक प्रशासनामार्फत निर्णय घ्यावा, अशी कल्पना दिली; पण लोकप्रतिनिधींनी त्यात आडकाठी आणली.'' 

श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र बचाव आंदोलन 

श्रीरामपूर : कोरोनाविरोधातील लढाईत महाआघाडीचे सरकार अपयशी ठरत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोनाविरोधात उपाययोजना करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याने भारतीय जनता पक्षातर्फे आज देशभरात राज्य सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. 
भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील वाणी व शहराध्यक्ष किरण लुणिया यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर, बेलापूरसह तालुक्‍यात आंदोलन करण्यात आले. तालुका व शहर मिळून 134 बूथवर आंदोलन करण्यात आले. गर्दी न करता, तसेच रस्त्यावर न येता प्रत्येकाच्या घराच्या अंगणात हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP workers protest in front of their own houses