
जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यांत बूथ हॉस्पिटलने 3450 कोरोनाबाधितांवर यशस्वीरित्या उपचार केले. मात्र, या कामाबद्दल बूथ हॉस्पिटलला कोणताही मोबदला मिळाला नाही.
नगर ः जिल्ह्यात महत्त्वाचे कोविड सेंटर ठरलेल्या बूथ हॉस्पिटलला त्यांच्या कामाचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. हा मोबदला कोणी द्यायचा, हे निश्चित होते नव्हते.
अखेर आज दुपारी महापालिका प्रशासनाने हा मोबदला देण्याची तयारी दाखविली. त्यासाठी बूथ हॉस्पिटलला नवीन शासकीय नियमानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने बंद झालेली कोविड सेंटर पुन्हा सज्ज करण्यास सुरवात केली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने आनंद लॉन, नटराज हॉटेल, जैन पितळे बोर्डिंग व शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड सेंटर सज्ज ठेवले आहेत.
जिल्ह्यात रोज 200-300 कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जास्त त्रास होत नसणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे. गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय व विविध खासगी रुग्णालयांतील कोविड सेंटरमध्ये उपचार घेता येणार आहेत. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. असे असले, तरी महापालिकेने सर्व कोविड सेंटरना सतर्क ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यांत बूथ हॉस्पिटलने 3450 कोरोनाबाधितांवर यशस्वीरित्या उपचार केले. मात्र, या कामाबद्दल बूथ हॉस्पिटलला कोणताही मोबदला मिळाला नाही. बूथ हॉस्पिटलने महापालिकेकडे सुमारे पाच कोटी रुपयांची मागणीअर्ज केला होता.
बूथ हॉस्पिटलमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील रुग्ण येत असल्याने, हे बिल महापालिकेने द्यायचे की जिल्हाधिकारी कार्यालयाने, याबाबत जबाबदारी निश्चित होत नव्हती.
अखेर आज महापालिकेने बूथ हॉस्पिटलमधील व्यवस्थापकांना बोलावून हे बील महापालिकाच देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नवीन शासकीय नियमानुसार बुथ हॉस्पिटलला बील सादर करण्यास सांगण्यात आले आहे.