
फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी, एजंट व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर ः लॉकडाउनच्या काळात बहुतांशी सर्वांचीच कामे गेली होती. उद्योग-धंदे बसले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने काही गाईडलाईन घालून दिल्या होत्या. त्यामुळे तीन महिन्यांतील हप्ते भरण्याबाबत थोडासा दिलासा मिळाला होता. परंतु खासगी फायनान्स कंपन्यांनी मनमानी पद्धतीने वसुली सुरू केली होती. काही ठिकाणी तर त्यासाठी कर्जदाराला त्रासही देत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केली.
फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे पतीने आत्महत्या केल्याच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी, एजंट व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गंगा संतोष पालकर (रा. गोंधवणी) यांनी ही फिर्याद दिली. संतोष घनश्याम पालकर (वय 40) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी बजाज फायनान्स कंपनीचा वसुली अधिकारी तनवीर सिकंदर तांबोळी, एजंट विनायक मुसमाडे (दोघे रा. श्रीरामपूर) व नाव माहीत नसलेल्या कार्यालय व्यवस्थापकाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - संगमनेरमध्ये झाला कोरोना ब्लास्ट, कुटुंबच्या कुटुंब बाधित
पोलिसांनी सांगितले, की संतोष पालकर यांनी 29 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वाकडी शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पालकर यांच्या पत्नी गंगा पालकर यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध, थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा लावल्यामुळे पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद आज दिली.
पती संतोष यांनी सन 2018मध्ये बजाज फायनान्स कंपनीकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मार्च 2020मध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्याने लॉकडाउनमध्ये कर्जाचे हप्ते थकले होते.
पंधरा दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी तांबोळी, एजंट व व्यवस्थापक यांनी घरी येऊन पतीकडे थकीत हप्त्यांची मागणी केली. वेळेवर हप्ते भरले नाहीत, तर चक्रवाढ व्याज लावू, अशी धमकी दिली. त्यामुळे पतीने वैफल्यग्रस्त स्थितीत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.