Breaking : शिवसेनेच्या नेत्यावर बिबट्याचा हल्ला

गौरव साळुंके
Friday, 24 July 2020

प्रवरा कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवसेनेचे नेते सदाशिव कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील प्रवरा कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवसेनेचे नेते सदाशिव कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अशोकनगर फाटा परिसरातील रस्त्याने सायंकाळी कराड दुचाकीवर जात होते. कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. त्यात कराड जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने कालव्यातून झेप घेत धुम ठोकली. 

बिबट्याने केलेल्या हल्यात कराड यांच्या हाताला जखम झाली असुन परिसरात अनेक वर्षापासून बिबट्याची दहशत कायम आहे. हल्ल्याची माहिती परिसरात वारयासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांनी हल्ल्याचा प्रकार वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जावुन पहाणी केली. दरम्यान, कराड यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असुन पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

परिसरात वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोकनगरसह प्रवरानदी परिसरात परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याची दहशत कायम आहे. शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे, कालवडी तसेच लहान बालकांवर सायंकाळच्या सुमारास बिबटे हल्ले चढवितात.

अनेकदा हल्लाच्या घटना घडल्यानंतर वनविभाग पहाणी करुन पंचनामा करुन निघुन जातो. परंतु बिबटे पुन्हा हल्ले करतात. त्यामुळे तालुक्यातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नदीत परिसरातील पशुधनासह मानवजात धोक्यात आली आहे. वनविभागाने गोदावरी, प्रवरानदी पट्यातील बिबट्याचे सर्वेक्षण करुन पिंजरे लावावे. बिबट्यांना पकडुन जंगल परिसरात सोडावे, अशी मागणी तालुक्यातील अशोकनगर, खोकर, उक्कलगाव, निपाणी वाडगाव ग्रामस्थांनी केली आहे. 

कराड बालबाल बचावले
कराड हे श्रीरामपूरातील शिवसेनेचे नेते असुन गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. बिबट्याने दोन दिवसांपूर्वी परिसरातील एका चिमुरड्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु महिलेच्या प्रसगांवधानाने चिमुरडा बिबट्यापासुन बचावला. तर काल मध्यरात्री परिसरातील जोशी वस्तीसमोर बिबट्याने एका गाईवर हल्ला चढवून जखमी केले. तसेच खड्डी केद्र परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला चढवून फाडशा पाडला. वरील सर्व घटना ताज्या असताना आज बिबट्याने तालुक्यातील शिवसेनेचे नेते कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. परंतु सावधानतेमुळे कराड त्यातुन बालबाल बचावले.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Leopard attack on Shivsena leader in Ahmednagar district