लिंक रोडवरचा पूल गेला वाहून, वाहतूक झाली ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

नगर शहरातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात असून ते पावसामुळे अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहे.

नगर ः नगर-कल्याण महामार्ग ते नगर- पुणे महामार्ग रोड जोडणाऱ्या लिंक रोडवरील पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या शेजारी केलेला तात्पुरता पूल हा पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी आज केली. 

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहेत. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले यांना दिले. तसेच या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही बाजूने हा रस्ता बंद करून त्या ठिकाणी रस्ता बंदचे फलक लावावे. ज्याने करून कुठलाही अपघात होणार नाही. बाह्यवळण रस्त्यावरील पुलाच्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

नगर शहरातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात असून ते पावसामुळे अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे. अनेक जणांचे या खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत.

या वेळी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळा संपल्यावर सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यावेळी दिली. 

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संभाजी पवार, शाखा उप अभियंता बापूसाहेब वराळे ,वैभव वाघ, भूषण गुंड ,सोनू जगताप, सागर भांबरे, संतोष शेटे, आदिल खान आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bridge on Link Road collapsed, traffic was jammed