माणुसकी अजुनही जिवंत आहे; पोस्टासाठी जागेसह स्वखर्चाने त्यांनी बांधून दिली इमारत

मनोज जोशी
Sunday, 3 January 2021

चंद्रशेखर देशमुख यांनी लोणकर वस्ती येथील पोस्ट कार्यालयाला मोफत जागा तर दिलीच त्यावर स्वखर्चाने नूतन इमारत बांधून तिचे लोकार्पणही केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील माणुसकी दुर्मिळ होत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून तालुक्‍यातील संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक चंद्रशेखर देशमुख यांनी लोणकर वस्ती येथील पोस्ट कार्यालयाला मोफत जागा तर दिलीच त्यावर स्वखर्चाने नूतन इमारत बांधून तिचे लोकार्पणही केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशमुख म्हणाले की, लहानपणापासून वडील (कै.) यशवंतराव देशमुख यांनी समाज व तळागाळातील बांधवांसाठी झटले पाहिजे हे संस्कार दिले. एक भाकरी वाटून खायची ही सवय घरात पूर्वीपासून आहे. या विचारातून नूतन इमारत बांधून ती पूर्ण झाली व आज माझ्या व कुटुंबियांच्या हस्ते उद्घाटन करताना मला कृतज्ञ वाटत असल्याचे ते म्हणाले. 

डाक निरीक्षक विनायक शिदे म्हणाले, की संपूर्ण देशात आडनाव असणारे एकमेव पोस्ट ऑफीस फक्त लोणकर वस्ती येथे आहे. पोस्ट विभाग ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावते. कोरोनाच्या काळात कोणतीही बॅंक आपल्या दारात येऊन पैसे देऊ शकली नाही, परंतु पोस्टमन दारोदारी हिंडून घरपोहच औषध पार्सल, मनीऑर्डर, ऑनलाईनचे पैसे देऊन आपली सेवा देत आहेत.

स्पर्धेच्या युगात पोस्ट विभागाने आपला विश्वास टिकवून ठेवला असून सन 1854 पासून अविरत सेवा देत आहे. राहुल आढाव, दत्तात्रय गाकवाड, जीवन पावडे, मेल ओवर्सियार अर्जुन मोरे, बाबासाहेब फुकटे, कैलास हदोळे, विजू बाभुळके, बी. टी. आहेर, हौशिरमा भिंगारे, ज्ञानदेव पगारे, किशोर दिघे, अंकिता अग्निहोत्री, प्रियांका फल्ले, कोमल फोफसे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Building constructed for post office in Kopargaon taluka