esakal | ब्रेकिंग! माजी प्राचार्यांच्या घरावर मध्यरात्री दरोडा
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary at the house of Agale former principal of Shri Dnyaneshwar College in Nevasa taluka

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या नेवासे येथील घरावर शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री दरोडेखोरांनी बंगल्याचे मुख्यद्वार तोडून प्रवेश करून  सोन्याचे दागिने चोरले.

ब्रेकिंग! माजी प्राचार्यांच्या घरावर मध्यरात्री दरोडा

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या नेवासे येथील घरावर शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री दरोडेखोरांनी बंगल्याचे मुख्यद्वार तोडून प्रवेश करून  सोन्याचे दागिने चोरले. दरम्यान आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.

प्राचार्य रघुनाथ आगळे व पत्नी कौशल्या आगळे असे दोघेचजण नेवासे फाटा- नेवासे रोडवरील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर असलेल्या बंगल्यात राहतात. प्राचार्य आगळे आजारी असल्याने १५ दिवसांपासून नगरला दवाखान्यात होते. तीनदिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले.

शुक्रवारी (ता. २१) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पाच- सहा दरोडेखोरांनी त्यांच्या बंगल्याचे मुख्यद्वार तोडून प्रवेश केला. ते आगळे दाम्पत्याला मारहाण करणार तोच त्यांच्या पत्नीने ‘सर आजारी आहे. तुम्हाला काय लागेल ते घ्या पण मारहाण करू नका, अशी विनंती केल्यावर चोरट्यांनी शांत राहण्याचा दम देऊन काहींनी घरातील सामानाची उचकपाचक केली तर काहींनी त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान दरवाजा तोडतांना झालेल्या आवाजाने शेजारच्यानां संशय आल्याने त्यांनी एकमेकांना फोन केल्याने अनेकांनी आगळे यांच्या बंगल्याकडे धाव घेतली. हे लक्षात आल्यावर दरोडेखोरांनी तेथून साततोळे सोन्याचे दागिने चोरून धूम ठोकली.
आगळे यांनी घटनेची माहिती नेवासे पोलिसांना देताच काही मिनिटातच रात्र गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक रणजित डेरे व त्यांचे पथक घटनास्थळी आहे. दरम्यान पहाटे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकास प्रचारण केले होते. मात्र श्वानने फक्त बंगल्यासमोरील नेवासे रोडपर्येंतच मग काढला. चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याच्या संशयावरून पोलिस  तपासणी करत आहेत. याप्रकरणी कौशल्या रघुनाथ आगळे यांच्या फिर्यादिवरून चोरट्यांविरोधात  नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तातडीने तपास लावा : 'संजीवन'ची मागणी
नेवासे तालुक्यात सामाजिक कार्यात कार्येरात व अग्रेसर असलेली ज्येष्ठ नागरिकांची 'संजीवन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव भणगे,  भैय्यासाहेब देशमुख, दत्तात्रय आघाव, रामदास कोरडे, सतीश मुळे, पंडित खाटीक यांनी पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास लावावा, अशी मागणी करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी. यासाठी  पोलिसांनी उपाययोजना करावी  अशीही मागणी केली.  प्राचार्य आगळे हे याया संघटनेचे क्रियाशील संस्थापक सदस्य आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर