esakal | कोविड सेंटर पाहून भारावले केंद्रीय पथक; ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील नियोजन, क्षमता, सुविधांचे केले कौतुक

बोलून बातमी शोधा

The central team is overwhelmed to see Jamkhed Kovid Center.jpg

पथकाने प्रकल्पाच्या नियोजित 'जम्बो सेंटर'ची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.

कोविड सेंटर पाहून भारावले केंद्रीय पथक; ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील नियोजन, क्षमता, सुविधांचे केले कौतुक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेडमध्ये शासन-सामाजिक संस्था व लोकसहभाग या त्रिस्तरावरुन 'निशुल्क' पणे चालविल्या जाणाऱ्या आगळवेगळ्या कोविड सेंटरला केंद्रीय पथकाने भेट दिली. रुग्णांसाठी असलेल्या सुविधा, सेंटरची क्षमता व भविष्यकाळातील नियोजन पाहून पथकाही अवाक झाले. त्यांनी सेंटरच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले.

कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाने रविवारी जामखेडला भेट दिली. पथकात डॉ. सुशील गुरिया, डॉ. गिरिश राव, डॉ. दादासाहेब साळुंके, डॉ. संजीव बेळंबे, डॉ. करण नागपूरकर यांचा समावेश होता. त्यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी आमदार रोहित पवार, प्रकल्पाचे संचालक रवी आरोळे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मीनिनाथ दंडवते, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत पथकाने कोविड सेंटरमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
 
पथकाने प्रकल्पाच्या नियोजित 'जम्बो सेंटर'ची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच तेथील सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात सर्वांत चांगली व्यवस्था जामखेड येथे असल्याचे त्यांनी नमूद केले. तद्‌नंतर पथकाने लसीकरण सुरू असलेल्या जामखेड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. लसीकरणासंदर्भातील माहिती घेतली. आवश्‍यक त्या सूचना केल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पथक कन्टोन्मेंट झोन म्हणून घोषित केलेल्या सावरगावला पोहचले. 

जामखेड पॅटर्न ठरू शकतो मार्गदर्शक 

आरोग्य प्रकल्पाच्या कोविड सेंटरमधून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मात्र मृत्यूदर नगण्य असल्याची बाब आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय पथकाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच येथे राबविलेला 'पॅटर्न' अन्य ठिकाणी मार्गदर्शक ठरू शकतो, असे निदर्शनास आणून दिले