भंडारदरा परिसरात आढळला "शॅमेलिऑन' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

जंगलात हा सरडा कित्येक तास एकाच जागी बसलेला दिसू शकतो. चपळतेने पळता येत नसले, तरी शिकार करण्यातील त्याच्या जिभेची चपळता थक्क करणारी आहे. जीभ हे त्याचे एकमेव अस्त्र आहे.

अकोले : भंडारदरा परिसरात काल (रविवारी) घोयरा सरडा अर्थातच शॅमेलिऑन पाहायला मिळाला. भंडारदरा धरणापासून चार किलोमीटवर असलेल्या चिचोंडी परिसरात प्रफुल्ल चंद्रकांत बांगर यांना रस्त्यात हा सरडा दिसला.

वेगात पळता येण्याची क्षमता नसल्याने, संथ गतीने जात असलेला हा सरडा एखाद्या वाहनाखाली सापडू नये म्हणून बांगर यांनी त्याला उचलून झाडावर सोडले. अर्थातच त्याआधी त्याची काही छायाचित्रेही घेतली.

हेही वाचा - त्या आमदाराची पत्नीही कोरोनाबाधित

स्टेट बॅंकेच्या मालेगाव (नाशिक) शाखेत शाखाधिकारी असलेले बांगर चिचोंडी येथील आपल्या शेतात दुचाकीवरून जात असताना त्यांना रस्त्याच्या मधोमध हा घोयरा सरडा आढळला. हिरड्याच्या झाडावर या सरड्याचे वास्तव्य असून, त्याचे खाद्य या झाडावर अधिक प्रमाणात मिळते, असे बांगर यांनी सांगितले.

खडबडीत दिसणारं या सरड्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपटी, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नि डायनासोरसारखा जबडा, असं हे "सुंदर' ध्यान. घोयरा क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही तो झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदूच पितो.

शक्‍यतो जमिनीवर न उतरणाऱ्या या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नि बीळ खोदून त्यात अंडी घालते. अन्य सरडे वेगाने तुरुतुरू पळताना दिसतात; पण घोयरा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहूल घेत, विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो. अगदी कुशल कसरतपटूप्रमाणे हा लवचिक फांद्यांवरही मस्त हालचाली करतो. शरीरातल्या प्रत्येक स्नायूवर त्याचा कमालीचा ताबा असतो. 
 

क्लिक करा - रोहित पवार म्हणतात, पारनेरचा कार्यक्रम ठरवून केला

जंगलात हा सरडा कित्येक तास एकाच जागी बसलेला दिसू शकतो. चपळतेने पळता येत नसले, तरी शिकार करण्यातील त्याच्या जिभेची चपळता थक्क करणारी आहे. जीभ हे त्याचे एकमेव अस्त्र आहे. त्याचे डोळे नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसविल्यासारखे असतात.

दोन्ही डोळ्यांचे शंकू तो स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरवू शकतो. म्हणजे एकाच वेळी पुढे आणि मागेही पाहण्याची त्याची क्षमता आहे. शरीर पुढच्या पायावर सावकाश तोलून, हळूच जबडा उघडून, थोडीशीच जीभ पुढे काढून तो शिकारीसाठी तयार असतो. टप्प्यात आलेली शिकार जीभ क्षणार्धात बाहेर फेकून तो मटकावतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Chameleon' found in Bhandardara area