महाविद्यालयांमध्ये आता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्‍यक

अशोक मुरुमकर
Saturday, 19 September 2020

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून शाळा महाविद्यालये बंद होती.

अहमदनगर : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून शाळा महाविद्यालये बंद होती. त्यामुळे परीक्षाही रद्द झाल्या. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व  प्राध्यापक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. याबाबत सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय प्रसिद्ध केला आहे.

कोविड १९ जागतिक महापारिमुळे देशात मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. महाराष्ट्रात पुण्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर गर्दी टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे दहावी व बारावीसह काही वर्गांच्या परीक्षा सोडून इतर वर्गांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्याही परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार आता परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात जुलै 2020 मध्ये मार्गदर्शक सूचनांना देण्यात आल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व महाराष्ट्र सरकारच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय दिला होता. 

त्यामुळे राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायचे आहेत. सदर परीक्षेच्या कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परीक्षा पद्धतीमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल जाहीर करणे, फेरमूल्यांकन करणे अशी अनेक कामे समाविष्ट आहेत. 

१ ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत या परीक्षा घेऊन त्याचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करायचा आहे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे कमी कालावधीत परीक्षा पार पडणे व त्यांचा निकाल जाहीर करणे हे आव्हानात्मक काम सध्या पूर्ण करण्यासाठी विद्यापीठे शैक्षणिक संस्थांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleges now require 100 per cent attendance of teachers and teaching staff