ऊसासाठी पुणे व नगर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये स्पर्धा

विलास कुलकर्णी
Saturday, 31 October 2020

राहुरी तालुक्यातील ऊस पळविण्यासाठी नगर व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्पर्धा लागली आहे.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी तालुक्यातील ऊस पळविण्यासाठी नगर व पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांची स्पर्धा लागली आहे. नगर जिल्ह्यातील चार व पुणे जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा तालुक्यात कार्यरत झाली आहे. त्यामुळे, राहुरी तालुक्यातील दोन साखर कारखान्यांना भविष्यात ऊस टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राहुरी तालुक्यात मुळा व भंडारदरा धरणाचे पाणी फिरले आहे. त्यामुळे "ऊसाचे आगार" म्हणून राहुरी तालुक्याची ओळख आहे. मागील वर्षी तीव्र दुष्काळामुळे तालुक्यात अवघा एक लाख टन ऊस उभा होता. ऊस टंचाईमुळे तालुक्यातील तनपुरे साखर कारखाना व प्रसाद शुगर कारखाना मागील वर्षी बंद राहिला होता. 

यंदा तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. विहिरी व कूपनलिका तुडुंब भरल्या आहेत. मुळा व भंडारदरा धरणाचे पाणी दोन महिन्यापासून नदीपात्रात आहे. त्यामुळे, मुळा व प्रवरा नदी काठच्या गावांची पाणीपातळी वाढली आहे. दुष्काळ हटल्यामुळे चालू सन 2020-21 गळीत हंगामासाठी तालुक्यात बारा लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. त्यामुळे तालुक्यातील दोन्ही कारखाने यावर्षी ऊस गाळपासाठी सज्ज झाले आहेत.

तनपुरे साखर कारखान्याने मिलमध्ये आधुनिकीकरण करून, गाळप क्षमता तीन हजार वरुन चार हजार मेट्रिक टन प्रतिदिन केली आहे. प्रसाद शुगर साखर कारखान्यानेही गाळप क्षमता अडीच हजार वरुन, साडेचार हजार मेट्रिक टन प्रतिदिन केली आहे. दोन्ही साखर कारखान्यांना गाळप क्षमतेच्या प्रमाणात तालुक्यात ऊस उपलब्ध आहे. परंतु, तालुक्याबाहेरील संगमनेर भाग, अगस्ती (अकोले), प्रवरा (राहाता), युटेक (संगमनेर), अंबालिका (कर्जत), दौंड शुगर (जि. पुणे) व पराग शुगर (शिरुर, जि. पुणे) या साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा तालुक्यात कार्यरत झाली आहे.

बाहेरचे साखर कारखाने दररोज दोन ते अडीच हजार मेट्रिक टन ऊस पळवीत आहेत. यंदा अतिवृष्टी व रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाची उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. त्यातच ऊस भावाची कोंडी अद्याप फुटलेली नाही. तनपुरे साखर कारखान्याने सहा लाख; तर, प्रसाद शुगरने सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, भविष्यात तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना ऊस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition for sugarcane in factories in Pune and Nagar districts