कौशल्याधारीत शिक्षणाची संकल्पना कर्मवीरांचीच, फाळकेंचे प्रतिपादन

नीलेश दिवटे
Thursday, 24 September 2020

कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत, डॉ. कांबळे यांनी आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सकारात्मक मत व्यक्त केले.

कर्जत : ""कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनीच सार्वत्रिक कौशल्याधारित शिक्षणाची संकल्पना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मांडली. आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ती जाणवू लागली आहे,'' असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके यांनी केले. 

दादा पाटील महाविद्यालयात सुरक्षित अंतर ठेवून कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची जयंती साजरी झाली. त्या वेळी फाळके बोलत होते. "रयत'चे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, बप्पासाहेब धांडे, बापूराव धांडे, खंडेराव शेंडगे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य संतोष पोटरे, सोनमाळी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश भोईटे, प्रा. भास्कर मोरे, डॉ. महेंद्र पाटील, कार्यालयप्रमुख खंडू खुडे उपस्थित होते. 

जागतिक महामंदीच्या काळात हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करणे शक्‍य नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था शाळा व महाविद्यालय व्यवस्थापनाने करावी, असे आवाहन पिसाळ यांनी केले.

कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत, डॉ. कांबळे यांनी आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सकारात्मक मत व्यक्त केले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अनंत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. प्रमोद परदेशी यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The concept of skill based education belongs to Karmaveer