मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे पेटवणार रान, जागोजागी केली मोर्चेबांधणी

Congress agitation against Modi government
Congress agitation against Modi government

संगमनेर ः चीनच्या हल्ल्यात 20 जवानांना हौतात्म्य येवूनही, चीनसमोर सपशेल शरणागती पत्करलेल्या मोदी सरकारने मिठाची गुळणी धरली आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे.

चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, चीनने सीमेवर केलेली आगळीक, 20 जवानांचा मृत्यू या बाबत मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही, अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करीत आहे.

भारताच्या 20 शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी, शुक्रवार ( ता. 26 ) रोजी शहिदों को सलाम दिवस पाळला जाणार आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. याच दिवशी Speakup For Our Martyrs ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर चालवली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. सलग 19 दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्त्याने वाढत आहेत. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे.

याच पार्श्वभूमीवर सोमवार ( ता. 29 ) रोजी केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्त करण्यात आले अाहेत. नागपूरसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, अमरावतीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईसाठी आमदार अमीन पटेल, कोकणसाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, उत्तर महाराष्ट्रासाठी आमदार कुणाल पाटील, मराठवाड्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, पश्चिम महाराष्ट्रासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फ्रंटल व सेल समन्वयक म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील तर सोशल मीडिया समन्वयक म्हणून अभिजित सपकाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com