बेलापुरात काँग्रेस-भाजपची सत्ता...आता झाला जांगडगुत्ता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

अंगणवाडीचे साहित्य सदस्यांना न विचारता खरेदी केलेच कसे? कोणत्या बैठकीत हा विषय घेतला? ग्रामपंचायतीने खरेदी केलेला संगणक दुसऱ्याच्या घरी गेलाच कसा? तो कुणाच्या घरी होता? याची लेखी उत्तरे पाहिजेत.

श्रीरामपूर ः तालुक्‍यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात तू-तू मै-मै सुरू आहे. त्यातून आज प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अडीच वर्षांच्या काळातील कामाची चौकशी करा, दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करा, असे आव्हानच एका पदाधिकाऱ्याने देत घरचा आहेर दिला. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपत आल्याने येत्या काही दिवसांत पंचायतीवर प्रशासक नियुक्तीची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या खडाजंगीची आज दिवसभर गावात चर्चा होती.

ग्रामपंचायतीत कॉंग्रेस व भारतीय जनता पक्ष संचालित जनता आघाडीची सत्ता असून, कॉंग्रेसच्या राधा बोंबले सरपंच व जनता आघाडीचे रवींद्र खटोड उपसरपंच आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या मासिक बैठकीत खटोड यांनी "आमच्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत,' असे पत्र दिले आहे. त्यानंतर एका तासातच एक धनादेश देण्यात आला. त्यामुळे खटोड यांनी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांच्याकडे माहिती मागितली. पंधरा दिवसांनंतरही माहिती न मिळाल्याने ते आज कार्यालयात आले. त्या वेळी खटोड व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

हेही वाचा - ही आजी लय खमकी हाय बर का

ग्रामपंचायतीतील सर्व कामे पारदर्शी झाली पाहिजेत. चुकीचे काम करणाऱ्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही, असे खटोड यांनी म्हणताच नवले म्हणाले, ""माजी सरपंच भरत साळुंके यांच्या काळातील सर्व कामे नियमाने झाली का? टाळखरेदी कोणत्या पद्धतीने झाली.'' त्यावर ""आम्ही पारदर्शी कारभार केला आहे. ई-निविदेने टाळखरेदी केली. आमच्या काळात झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचा अर्ज मीच देतो. दोषी सापडलो, तर फौजदारी कारवाई करा; पण यापुढे कुणाचेही चुकीचे काम खपवून घेणार नाही.'' 

अंगणवाडीचे साहित्य सदस्यांना न विचारता खरेदी केलेच कसे? कोणत्या बैठकीत हा विषय घेतला? ग्रामपंचायतीने खरेदी केलेला संगणक दुसऱ्याच्या घरी गेलाच कसा? तो कुणाच्या घरी होता? याची लेखी उत्तरे पाहिजेत, अशी मागणी खटोड यांनी चांडे यांच्याकडे करत टाळखरेदी कागदपत्रांची फाइलच त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली. या वेळी उपस्थित काही सदस्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-BJP dispute in Belapur