कृषी योजना थंड बस्त्यात; कृषी विभागाकडून अर्ज मागणी नाही

मार्तंड बुचुडे
Tuesday, 6 October 2020

कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यात कांदाचाळ, शेततळी, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन, फुंडकर फळबाग योजना यांसाठी सरकार अनुदान देते.

पारनेर (अहमदनगर) : दर वर्षी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यात कांदाचाळ, शेततळी, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन, फुंडकर फळबाग योजना यांसाठी सरकार अनुदान देते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतात. मात्र, या वर्षी कृषी विभागाने कोणतेही अर्ज मागविले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी योजनांना मुकणार आहेत. 

दर वर्षी कृषी विभागाकडून "महा-डीबीटी' पोर्टलद्वारे विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानही दिले जाते. अनेक योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, 2020-21 आर्थिक वर्षात फक्त यांत्रिकीकरण, त्यात ट्रॅक्‍टर व शेतीऔजारे योजनांसाठीच अर्ज मागविले आहेत. इतर योजनांसाठी अर्ज मागविलेले नाहीत. 

कांदाचाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ठिबक सिंचन, तसेच फळबाग योजनांसाठी कृषी विभागाने अद्याप जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही, अर्जही मागविले नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या योजना सरकारने तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.

अनेक सेतू केंद्रांत वरील योजनांसाठी कृषी विभागाकडून जाहिरात नसतानाही अर्ज भरून घेतले जात आहेत. या योजनांसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे गोळा करणे, तसेच अर्ज करण्यासाठी विनाकारण पैसे खर्च होत आहेत. सेतूचालकही अर्ज भरून घेण्यासाठी 100-200 रुपये घेत आहेत. कदाचित यापुढील काळात ही योजना सुरू झाली, तरी आता दाखल केलेले अर्ज त्या वेळी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याने, शेतकऱ्यांनी असे अर्ज करू नयेत, असे तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी सांगितले. 

दर वर्षी कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या वरील योजना या वर्षी न राबविल्याने, अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे या योजनेत काही शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज करूनही लाभ झाला नाही. 
- विनायक लगड, शेतकरी, वाळवणे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress cauldron in front of Shrirampur Municipality for water