esakal | मोदी सरकारकडून तरुणांचा भ्रमनिरास; तरुणांना त्वरित नोकऱ्या द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Congress demands central government to provide jobs to youth

संगमनेर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील तरुणांचा पूर्णतः भ्रमनिरास केला.

मोदी सरकारकडून तरुणांचा भ्रमनिरास; तरुणांना त्वरित नोकऱ्या द्या

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील तरुणांचा पूर्णतः भ्रमनिरास केला. उलट कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे लॉकडाउननंतर उद्‌भवलेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. सुशिक्षित व गरजू तरुणांना तातडीने नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी युवक कॉंग्रेसने केली. 

या संदर्भात युवक कॉंग्रेसच्या येथील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की केंद्रातील भाजप सरकारने सहा वर्षांत तरुणांचा मोठा भ्रमनिरास केला. अनेक सहकारी संस्था मोडीत काढून खासगीकरणाला बळकटी दिली. जीएसटी, नोटबंदी या आत्मघातकी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः रसातळाला गेली. यातच दुर्दैवाने आलेल्या कोरोना संकटामुळे देशात सुमारे 12 ते 15 कोटी नागरिक बेरोजगार झाले.

ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत्या बेरोजगारीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्राने जाहीर केलेले 20 लाख कोटींचे पॅकेज केवळ घोषणाच ठरली. सहकारी व लघु उद्योगांच्या सक्षमतेसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. 

युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका उपाध्यक्ष सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे, सचिन खेमनर, रमेश गफले, तान्हाजी शिरतार, भागवत कानवडे आदी उपस्थित होते. या अभियानात सहभागासाठी युवकांनी 799879985 या क्रमांकावर मिस्डकॉल देण्याचे आवाहन सांगळे यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर