बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार; रस्त्याचा डांबर झाला गायब, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

शांताराम काळे 
Wednesday, 27 January 2021

बांधकाम विभाग या ठिकाणच्या आदिवासी समाजाच्या जिवाशी खेळत असून या खड्यामधील डांबराचे काय झाले? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

अकोले (अहमदनगर) : भंडारादरा ते रंधा रस्त्यावर मोठ-मोठे खडे पडले आहे. या बाबतीत वारंवार बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी मात्र भंडारादरा (शेंडी) या ठिकाणी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार येणार म्हणून या सुस्त झालेल्या बांधकाम विभागाला जाग आली. तसेच घाईघाईने भंडारादरा ते रंधा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. परंतु खड्यांमध्ये डांबर न टाकताच फक्त मोकळी खडी टाकली असून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ही खडी रस्तावर आल्याने मोठे अपघात होऊ शकतात. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

बांधकाम विभाग या ठिकाणच्या आदिवासी समाजाच्या जिवाशी खेळत असून या खड्यामधील डांबराचे काय झाले? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. व या रस्त्यात आलेल्या खडीमुळे कोणाचा जिव गेला तर याला जबाबदार बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी असतील. तर लोकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला? अशा संतप्त भावना या ठिकाणच्या रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा : शेतकऱ्यांची भेंडा ते कुकाणे तिरंगा ट्रॅक्टर रॅली; अखिल भारतीय किसान सभेचे आयोजन

मात्र या अनुषंगाने असा प्रश्न पडतो की निवडणूक आली की स्वतःला आदिवासीचे कैवारी समजणारे अनेक नेते पुढारी अशा वेळेस कुठे असतात. अशावेळी कोणाचा तरी जीव जाण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेली खडी तरी बाजूला करावी आणि आदिवासी लोकांच्या जिवाचा खेळ थांबवावा, अशी मागणी सरपंच परिषदेचे पांडुरंग खाडे, सुनील सारूक्ते आणि ५० कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे .
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The construction department is not paying any attention to the road from bhandaradara to randha