नगर तालुक्‍याचे कोरोना मीटर सुरू 

corona 23
corona 23

नगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकोडी, निंबळक या गावांत आज कोरोना पॉझेटिव्ह रूग्ण सापडले. त्यामुळे नगर तालुक्‍याचे कोरोना मीटर सुरू झाले आहे. मुंबई रिटर्न झालेल्यांमुळे तालुक्‍यात कोरोना वाढत असल्याची चर्चा आज तालुक्‍यात आहे. 

वाकोडी येथे मुंबई रिटर्न असलेल्या एका 41 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी दिली. दरम्यान बायकोकडे आला अन्‌ कोरोनाबाधित निघाला असे बोलले जात आहे. मुंबईमधून निंबळक येथे आलेली 30 वर्षीय गरोदर महिलाही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती बाळंतपणासाठी मुंबईवरून आल्यावर ही महिला स्वतःहून तपासणी करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिची तपासणी करण्यात आली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्या महिलेच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. 

मुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिकमधील नागरिक जिल्ह्यात येऊ लागल्याने हळूहळू ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरायला सुरवात केली आहे. नगर तालुक्‍यातील आलमगीर वगळता इतर गावे कोरोनामुक्त होती. परंतु, आज वाकोडीत एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाकोडीतील व्यक्ती 18 तारखेला मुंबईहून आली होती. त्याच्याबरोबर त्यांची दोन मुलेही आली आहेत. मुले त्याने नातेवाईकांकडे सोडली आहेत. त्या व्यक्तीला त्रास होवू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी मांडगे यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. 

"त्यांना' कारणेदाखवा नोटिसा 
निंबळक येथे रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांना शाळेत विलगीकरण कक्षामध्ये दाखल न केल्याने तहसीलदार उमेश पाटील यांनी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना कारणेदाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com