कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची गती अवघी सहा टक्क्यांवर

आनंद गायकवाड
Tuesday, 20 October 2020

संगमनेर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : काही दिवसांपासून संगमनेर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटत आहे. काल प्रशासनाने घेतलेल्या 227 संशयितांच्या रॅपिड अँटिजेन चाचणीतून शहरातील सहा जणांसह एकूण चौदा जण पॉझिटीव्ह आले असून, हे प्रमाण अवघे 6.11 टक्के असल्याने ऐन सणासुदीच्या काळात तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून 227 जणांचे स्राव रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारे तपासण्यात आले. या चाचण्यांमधून अवघ्या 6.11 टक्के वेगाने १४ जणांचे निष्कर्ष सकारात्मक तर तब्बल 213 जणांचे निष्कर्ष नकारात्मक आले आहेत. आत्तापर्यंत सरासरी 20 ते 22 टक्के दराने रुग्ण समोर येत असतांना सरासरीत मोठी घट झाल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची टक्केवारी दररोज वाढत असून ती 94.22 टक्क्यावर पोचली आहे. 

अखेर शहरासह तालुक्यातील 174 पैकी 151 गावे कोविड संक्रमित झाल्याचे आढळले आहे. रुग्णांच्या शोधासाठी 19 हजार 351 चाचण्या केल्या आहेत. त्यात सर्वाधीक 12 हजार 869 चाचण्या रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा, 3 हजार 980 चाचण्या शासकीय प्रयोगशाळेद्वारा, तर 2 हजार 502 चाचण्या खासगी प्रयोगशाळेद्वारा करण्यात आल्या आहेत. या सर्व चाचण्यांमधून सरासरी रुग्ण समोर येण्याची गती 20.47 टक्के आहे.

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येपासून शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णवाढीला लागलेली ओहोटी कायम आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या 3 हजार 963 वर पोचली आहे. त्यातील शहराची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 141 तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 2 हजार 822 वर पोचली आहे. आजवर 40 मृत्यू झाले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona positive patient detection rate is only six percent