हम नही सुधरेंगे! बसस्थानकावर एसटीत जागा धरण्याची जीवघेणी धडपड

आनंद गायकवाड
Friday, 20 November 2020

सुमारे आठ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. या पार्श्वभुमिवर कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने लागू केलेले निर्बंध विविध टप्प्यांवर काढून घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा आणी मोकळीक मिळाली.

संगमनेर (अहमदनगर) : सुमारे आठ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. या पार्श्वभुमिवर कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने लागू केलेले निर्बंध विविध टप्प्यांवर काढून घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा आणी मोकळीक मिळाली. याचा गैरफायदा घेत कोरोनाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन दाखवलेल्या अवाजवी धाडसाचे परिणाम समोर येण्यास सुरवात झाली असून, तालुक्याच्या रोडावलेल्या कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन दिवसांपासून दररोज अर्धशतकी खेळी करण्यास सुरवात केली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी गणेशोत्सव, पोळा, नवरात्र, दसरा यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे माहित असल्याने, दिवाळीत कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याचेही अंदाज वर्तविले गेले. त्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर झाली, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नागरिकांना साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र दिवाळीच्या उत्साहात नागरिकांना या तत्त्वांचा आणि आवाहनाचा विसर पडला.

कोविड संक्रमणाचा काळ असूनही संगमनेरकरांनी त्याकडे सर्रास दुर्लक्ष करुन खरेदीचा आनंद लुटल्याचे दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. दिवाळीच्या सुरवातीच्या दोन दिवसांपासून आजपर्यंतच्या आठच दिवसांत तालुक्यातील संक्रमणाची गती पुन्हा एकदा चढणीला लागली आहे. मंगळवार ( ता. 17 ) रोजी नोव्हेंबरमधील सर्वाधिक 56, बुधवारी 39 तर गुरुवार ( ता. 19 ) रोजी 50 अशा प्रकारे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात शहरासह तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

निष्काळजीपणाने केलेला प्रवास व दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक प्रवासी सेवा सुरु झाल्याने, संगमनेरच्या बसस्थानकातून आंतरजिल्हा व जिल्ह्याबाहेरच्या लांब पल्ल्याच्या एसटी बस सरु झाल्या. कोरोनाचे सर्व नियम धुडकावीत माहेरी जाण्यासाठी मुलाबाळांसह निघालेल्या उत्साही प्रवाशांनी बसस्थानक गजबजले. बस फलाटाला लागताच जागा धरण्यासाठी मोठी गर्दी झाली. पुन्हा एसटीच्या खिडकीतून सामानांच्या पिशव्या व लहान मुले चढवून जागा धरण्याचे प्रकार सुरु झाले. 

संगमनेर शहरात कापड, किराणा आदींच्या खरेदीसाठी एका दुचाकीवर तीन, चारच्या संख्येने आलेल्या ग्राहकांची कमी नव्हती. मास्क वापरण्याचा सोईस्कर विसरही पडला होता. आता 23 नोव्हेंबर रोजी नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा घाट घातला जातोय. खरेदीसाठी धोकादायक गर्दीत फिरलेल्या मुलांपासून संक्रमणाचा धोका होवू शकतो. यातून इतरांपर्यंत तो पोचू शकतो याची दखल संस्थाचालक व पालकांनीही घेणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने दुकानदार आणि ग्राहक अशा दोहींसाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसार संगमनेरातील बहुतेक दुकानदारांनी व्यवस्थाही केल्या होत्या. मात्र रस्त्यावरील गर्दी, फेरीवाले विक्रेत्यांचाही समावेशामुळे नियमांचा फज्जा उडाला. यामुळे त्याचे परिणाम आता समोर येत असल्याने शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of passengers to take seats in the ST at the stand in Sangamner