नगरमध्ये रात्रीचं लॉकडाउन... कोरोनाचा संचार, माणसांना बंदी

Curfew imposed in Ahmednagar due to increase in corona patients
Curfew imposed in Ahmednagar due to increase in corona patients

नगर ः आप बाहर कोरोना अंदर, आप अंदर कोरोना बाहर...असे म्हणून प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. मात्र, त्याला नगरकरांकडून हरताळ फासला जात आहे. त्यामुळे नगरमध्ये बहुतांशी भागात कोरोनाचा संचार आहे. नागरिक सांगूनही ऐकत नसल्याने त्यांच्या संचारास बंदी घातली आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जणू काही कोरोना नगरकरांमागे हात धुवून लागला आहे, अशीच शहरात स्थिती आहे.

याच पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आजपासून 17 जुलैच्या कालावधीसाठी महापालिका हद्दीत सुधारित प्रतिबंधात्मक फर्मान जारी केले. सायंकाळी 7 सकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

नगर शहरात कोरोनाचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे याला लगाम लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काल (गुरूवार) याबाबत आढावा घेतला. त्यानंतर आज (शुक्रवारी) तातडीने महापालिका हद्दीसाठी सुधारित प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.

आदेशानुसार कोणत्याही रस्त्यावर विनाकारण भटकण्यास बंदी घातली आहे. आदेश जारी असल्याच्या तारखेपर्यंत सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त इतरांना फिरण्यास मनाई आहे. शहरातील हॉटस्पॉट वगळता हा आदेश जारी राहणार आहे. नागरिकांनी कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जारी करण्यात आलेले आदेश व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. 

आदेशातून यांना वगळले 
शासकीय, निशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना त्यात कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, रुग्णालये, दवाखाने, औषधे, फार्मा, पॅथॉलॉजी लॅब्रोटरी, इलेक्‍ट्रीसिटी, पेट्रोलियम ऑईल, ऊर्जा संबंधित व्यक्ती, आस्थापना, दूरसंचार, इंटरनेट सेवा, वैध ओळखपत्र असणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अन्न धान्य, किराणा व इतर जीवानाश्‍यक वस्तूंचे होम डिलिव्हरी सेवा, पिण्याचे पाणी पुरवठा व दुरुस्तीचे कामकाज व माल वाहतूक करणारे टेम्पो, ट्रक यांना यातून वगळण्यात आले आहे. 

कोटकोर अंमलबजावणीसाठी 26 पथकांची फौज 
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका हद्दीमध्ये तब्बल 26 पथकांची फौज तैनात केली आहे. पथकांचे समन्वय अधिकारी म्हणून महापालिका उपायुक्त प्रदीप पठारे, प्रभारी उपायुक्त संतोष लांडगे व सहायक आयुक्त एस. बी. तडवी यांची नियुक्ती केली आहे. सनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारी न पार पाडल्यास त्यांच्यावरही कारवाईचा इशारा आदेशात दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com