ओव्हरफ्लो होऊनही जायकवाडी नगरकरांच्या मुळावर!

सचिन सातपुते
Tuesday, 22 September 2020

अनेक शेतक-यांना धरणासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापि मिळालेला नाही. त्यातच धरणात मोठया प्रमाणावर गाळ साचून ते उथळ झाले आहे.

शेवगाव : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले अाहे. ही मराठवाड्यातील शेतकरी तसेच उद्योजकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. परंतु नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ती नुकसानकारक आहे. नुकसानीमुळे हे धरण त्यांच्या मुळावर आलं आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात मराठवाडाविरूद्ध नगर-नाशिक असा संघर्ष उभा राहतो. नगर-नाशिककरांना वाटते मराठवाडा आमचे पाणी पळवतो. तर मराठवाड्याला वाटतं आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही. यंदा पावसाळ्यातही धुसफूस सुरू झाली आहे. धरण भरल्यांनतरही नगरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.

धरणासाठी संपादीत न केलेल्या शेत जमिनीत धरणाचे फुगवट्याचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे पिके सडल्याने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

या नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश देवून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे पत्र आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले. 

जायकवाडी धरणाच्या निर्मीतीवेळी तालुक्यातील 20 ते 22 गावातील सुपीक जमीन संपादीत करण्यात आली. शेतक-यांनी सुपीक जमिनी देवून केलेल्या त्यागामुळे मराठवाडयातील हजारो एकर जमीन जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली आल्याने सुजलामसुफलाम झाली.

अनेक शेतक-यांना धरणासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापि मिळालेला नाही. त्यातच धरणात मोठया प्रमाणावर गाळ साचून ते उथळ झाले आहे. त्यामुळे धरण 90 टक्यांपेक्षा जास्त भरल्यानंतर त्याचे पाणी परिसरातील शेतक-यांच्या असंपादीत शेतजमिनीत शिरते.

या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतक-यांच्या असंपादीत जमिनीतील ऊस, कपाशी, बाजरी, तूर, मका यांच्यासह फळबागांमध्ये पाणी जावून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसाठी केलेला अमाप खर्च वाया गेल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे होवून नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे. 

या बाबतचे पत्र पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, तहसीलदार शेवगाव यांच्याकडे मदतीची याचना केली जात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to Ahmednagar farmers due to overflow Jayakwadi dam