श्रीरामपूरात पाणीसाठवण तलावात विवाहीतेचा मृतदेह

गौरव साळुंके
Friday, 14 August 2020

गोंधवणी परिसरातील पाणीसाठवण तलावात एका महिलेचा मृतदेह आढळुन आला. मुस्कान सलमान शेख (वय २०, रा. पढेगाव) असे मयत महिलेचे नाव आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरानजिक असलेल्या गोंधवणी परिसरातील पाणीसाठवण तलावात एका महिलेचा मृतदेह आढळुन आला. मुस्कान सलमान शेख (वय २०, रा. पढेगाव) असे मयत महिलेचे नाव आहेत. यापुर्वीही सदर पाणीसाठवण तलावात एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर काल पुन्हा मृतदेह आढला.

मुस्कान या विवाहीत असून येथील मिल्लतनगर परिसरातील नजीर सय्यद यांची ती मुलगी आहे. मागील काही दिवसांपासुन ती माहेरी राहत असुन नागरीकांना दुपारी तलावातील पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला. सदर माहिती शहर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरिक्षक समाधान पाटील यांच्या

मार्गदर्शनाखाली शहर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. पालिका कर्मचाऱ्याच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढुन पंचनामा करण्यात आला. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी कामगार रुग्णालयात पाठविण्यात आला. मागील दोन महिन्यांपुर्वी एका तरुणांचा मृतदेह पाणीसाठवण तलावात आढळुन आला होता. तसेच एक वर्षापुर्वीही एक अनोखळी महिलेचा मृतदेह तलावात आढळला होता.

गोंधवणी येथील पाणीसाठवण तलावातील पाणी शहर परिसरात पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. पाणी साठवण तलावात मृतदेह आढळुन येत असल्याने साठवण तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीसाठवण तलावाची सुरक्षा यंत्रणा वाढवुन तलाव परिसरात फिरणाऱ्या नागरीकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead Body of a married woman was found in a water storage pond in Shrirampur taluka