पारनेर हादरले... मुंबईहून आलेल्या वृद्धाचा मृत्यू, कारण गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

जिल्हा रूग्णालयात रात्री उशिरा दाखल केल्यानंतर त्याचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेण्यात आला. अहवाल आला नसल्याने मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याची पत्नीही आजारी असल्याने तिलाही आता जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

पारनेर ः म्हसणे येथील जावई कोरोना बाधित निघाला असतानाच आज (ता. 26 ) पुन्हा मुंबई (नेरूळ ) येथून आलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. त्याचा स्त्राव घेतला असून अद्यापि अहवाल आलेला नाही. तसेच म्हसणे येथील जावायाची पत्नी, मुलगा व बाधीत जावायास रूग्णालयात घेऊन जाणारा खाजगी रूग्णवाहिकेचा चालक यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

गेली अनेक दिवस तालुका कोरोनापासून मुक्त होता. मात्र, जावई मंडळी तालुक्यात आली आणि तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका जावयाचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. 25) म्हसणे येथे  मुंबई येथून आलेला जावई कोरोनाबाधित निघाला. त्याची 24 वर्षीय पत्नी, चार वर्षीय मुलगा व त्यास जिल्हा रूग्णालयात घेऊन जाणा-या खाजगी रूग्णवाहिकेचा चालक अशा तिघांचे स्त्राव घेतले आहेत. त्यांचा अहवाल अद्यापि आला नाही.

हेही वाचा - कोरोनाबाधिताचा नातेवाईकच मटका बुकी...चिठ्ठ्यांसोबत कोरोना वाटल्याची भीती

आज पुन्हा एकदा जामगाव येथील रहिवाशी व 12 मे रोजी मुंबई (नेरूळ) येथून आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती होम क्वारंटाईन केलेली होती. मात्र, तिला काल त्रास होऊ लागल्याने केडगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. त्या नंतर रात्री उशिराने अधिक त्रास जाणवल्याने शहरातील दुस-या खाजगी दवाखाण्यात दाखल केले. मात्र, तेथेही काही वेळ ठेऊन त्यास अधिक त्रास होत असल्याने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पत्नी खासगी दवाखान्यात 

जिल्हा रूग्णालयात रात्री उशिरा दाखल केल्यानंतर त्याचा आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेण्यात आला. अहवाल आला नसल्याने मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याची पत्नीही आजारी असल्याने तिलाही आता जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. संबंंधित व्यक्तीला मधूमेह, रक्तदाब व इतरही आजार होते. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. आता दिवसेदिवस पारनेरमधील कोरोना बधितांची संख्या वाढते की काय अशी भीती जनतेतून व्यक्त होत आहे.

जावईबापू जरा जपून

तालुक्यातील जनतेने कठोर होऊन जावई पाहुणचार प्रथा बंद करावी. कुटुंबातील असो किंवा पाहुणा असो तो कोठूनही आला तरी त्यास क्वारंटाईन केल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये. तसेच लोकांनी सुद्धा आहे तेथेच थांबावे विनाकारण शहरातून गावी येऊन गावच्या लोकांचा धोका वाढवू नये.-डॉ. प्रकाश लाळगे.तालुका आरोग्य अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of an old man from Mumbai in Parner