फक्त उभ्या पिकांचाच पंचनामा; नुकसान होऊनही मदतीपासून शेतकरी राहणार वंचित 

शांताराम काळे
Wednesday, 28 October 2020

परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

अकोले (अहमदनगर) : परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळावे, यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल सावलीला नेण्याचा प्रयत्न केला. परिणामी नुकसान होऊनही शेतकऱ्यांची ही पिके आज उभी दिसत नसल्याने या नुकसानीची नोंद केली जात नसल्याने शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. 

विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात भरपाईपासून वंचित राहत आहेत. फळ पिकांच्याबाबत केवळ फळे लागलेल्या बागांच्याच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फळावर न आलेल्या बागांचे राज्यात अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी, आंबे उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित रहात आहेत. अति पावसाने ऊस व कपाशीचेही मोठे नुकसान झाल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत. 

पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, पंचनामे करताना कागदपत्रांच्या पूर्तता करण्यात खूप वेळ जात आहे, शिवाय कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष पंचनाम्यांना मर्यादा येत आहे. परिणामी शेतीतील पाणी आटून गेल्यावर व शेतकऱ्यांची पिकांची काढणी, मळणी करून झाल्यावर अधिकारी पंचनामे करण्यासाठी शेतात पोहचत आहेत. पंचनाम्यांमध्ये यामुळे नुकसानीच्या खऱ्या स्वरूपाची नोंद होत नाही.  अशा परिस्थितीत सरकारने पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी किसान सभा करत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for assistance to all farmers in Akole taluka through panchnama