अकोले तालुक्यात पेसा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करा

शांताराम काळे
Tuesday, 4 August 2020

अकोले तालुक्यातील पेसा क्षेत्रात जून, जुलै व ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविली असल्याने भात आवणी झाली नाही.

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील पेसा क्षेत्रात जून, जुलै व ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविली असल्याने भात आवणी झाली नाही.

पुरेशा पावसाअभावी भात पिके व इतर पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पेसा भागातील शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या भागात पाऊस नसल्याने सरकारने तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी पेसा सरपंच परिषदेने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे. 

आज ५० गावातील सरपंच एकत्र येत त्यांनी १०विविध मागण्या करून गट विकास अधिकारी, कृषी, शिक्षण, आरोग्य, महसूल या कार्यालयात निवेदने दिली.

या निवेदनात म्हटले की, सध्या देशात व राज्यात कोरोना या विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे. लॉकडाऊनमुळे पाच महिन्यापासून सर्व नागरिक घरात बसून आहेत. कुठल्याही प्रकारचा रोजगार अथवा हाताला काम नाही. तर विद्यार्थी घरात असून शालेय पोषण आहार देण्यापेक्षा पालकांच्या खात्यात तो निधी वर्ग करावा. शालेय पोषण आहार वाटण्यास सुरुवात केली तर सामाजिक अंतराचा फज्जा उडेल. यावर वरिष्ठ कार्यालयात आपले निवेदन पाठवून दोन दिवसात त्यांचे उत्तर घेण्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी मान्य केले. 

मनरेगाची कामे, कृषी विभागाचे बियाणे, खते व शेती कामाचे बाबत चर्चा करून कृषी अधिकाऱ्याला जाब विचारण्यात आला. गटविकास अधिकारी चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे, बांधकाम विभागाचे वाकचौरे, शिक्षण विभागाचे अरविंद कुमावत, कृषी विभागाचे प्रवीण गोसावी यांनी माजी आमदार वैभव पिचड, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख व सरपंच परिषदचे पदाधिकारी व सरपंच यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन कामात बदल करणयाची हमी दिली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for declaration of drought in Pesa area in Akole taluka