
महापालिकेने मालमत्ताकरावर 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली. ही शास्तीमाफी केवळ नोव्हेंबरसाठी आहे.
अहमदनगर : महापालिकेने मालमत्ताकरावर 75 टक्के शास्तीमाफी जाहीर केली. ही शास्तीमाफी केवळ नोव्हेंबरसाठी आहे. या शास्तीमाफीची मुदत संध्याकाळी संपत आहे. शास्तीमाफी मिळत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात कर भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. या गर्दीत कोरोना वाढू नये म्हणून काही सजग नागरिक मालमत्ताकर भरण्यासाठी आलेले नाहीत.
त्यामुळे शास्तीमाफीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने मालमत्ताकराची शास्तीमाफी दिल्यामुळे नगरच्या नागरिकांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर मालमत्ताकर जमा केले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी पाहून कोरोनाच्या भीतीने आत्तापर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही त्या नागरिकांसाठी महापालिकेने मुदत वाढवून द्यावी यामध्ये महापालिकेत आर्थिक दृष्ट्या चांगल्याप्रकारे रक्कम जमा होऊन महापालिकेचे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावता येतील.
या मागणीनंतर आयुक्त म्हणाले, (सोमवारी) यावर निर्णय घेऊन मुदत वाढवण्यात येईल. जेणेकरून नागरिकांना मालमत्ता कर भरता येईल. यामुळे कोरोनाचा संसर्ग नगरमध्ये वाढणार नाही, असे आयुक्त म्हणाले.
संपादन : अशोक मुरुमकर