रब्बीसाठी १५ जानेवारीपूर्वी घोड धरणातून अवर्तन सोडण्याची मागणी

संजय आ. काटे
Friday, 1 January 2021

घोड धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही रब्बी आवर्तन उशिरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या लाभक्षेत्रात पिकांना पाण्याची आवश्‍यकता असून 15 जानेवारीपूर्वी आवर्तन सोडावे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : घोड धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही रब्बी आवर्तन उशिरा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या लाभक्षेत्रात पिकांना पाण्याची आवश्‍यकता असून 15 जानेवारीपूर्वी आवर्तन सोडावे अन्यथा डाव्या कालव्यावरील पिके हाती लागणार नाहीत, असा इशारा देत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कालवा सल्लागार समितीने घेतलेला निर्णय बदलण्याची मागणी केली. 

नागवडे म्हणाले, की घोड धरणात सध्या पूर्ण क्षमतेचा साठा आहे. या परिस्थितीत तीन किंवा चार आवर्तने होतील. सध्या डाव्या कालव्यावरील श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍यातील उभ्या पिकांना पाण्याची गरज आहे. ऊसासोबतच गहू, ज्वारी, हरभरा, कांदा व फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिरीचे व विंधन विहिरीचे पाणी कमी झाले आहे. पर्यायाने अनेक शेतकऱ्यांनी घोडच्या पाण्यावर पिकांचे नियोजन केले आहे. ही स्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दोन दिवसांपूर्वी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घोड धरणातून थेट 10 फेब्रुवारीला आवर्तन सोडण्याचे ठरवण्यात आले. मात्र, हा घोडच्या लाभधारकांना वर अन्याय आहे. कारण धरणात पाणी असताना पिके हातची जाणार असली तर त्या पाण्याचा उपयोग होणार नाही.

पर्यायाने हे आवर्तन 10 फेब्रुवारी ऐवजी 15 जानेवारीला सोडून शेतातील पिके जगवणे बाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. जर कालवा सल्लागार समिती ठरलेल्या निर्णयावर जलसंपदा विभाग ठाम राहिले तर, नाईलाजाने आम्हालाही पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही नागवडे यांनी दिला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for release of Avartan from Ghod Dam before 15 th January for Rabbi