esakal | "येथे' प्रशासकीय कामे "वर्क फ्रॉम होम'... 
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for work from home in Nagar Zilla Parishad

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आज अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत एकूण सात जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

"येथे' प्रशासकीय कामे "वर्क फ्रॉम होम'... 

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आज अखेरपर्यंत जिल्हा परिषदेत एकूण सात जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. एका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमधून होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. रोज जिल्ह्यात चारशेच्या घरात रुग्ण आढळत आहेत. त्यातबरोबर जिल्हा परिषदेतही अधिकाऱ्यांसह कर्मचारी कोरोना बाधीत निघत आहेत. यातील काहीजण रात्रीच्या वेळी चेकनाक्‍यांवर नियुक्त असल्यामुळे कोरोना बाधीत झालेले आहेत. तर काहीजण इतर ठिकाणचा संपर्क आल्याने पॉझिटिव्ह झालेले आहेत. आतापर्यंत एकूण सातजण कोरोनाबाधीत झाले असून त्यात दोन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील एकाचा मृत्यूही झालेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज बंद करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद ठेऊन आज शुक्रवारी (ता. 31) वर्क फार्म होम देण्यात आले. परंतु यावर कायमस्वरुपी उपाय करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांना दोन सत्रात काम द्यावे, अशी मागणी केलेली आहे. मात्र प्रशासनाने त्यावर अद्याप सकारात्मक विचार केलेला नाही. 

जळगाव जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून "वर्क फॉर्म होम' ही संकल्पना राबविली आहे. तशीच संकल्पना नगर जिल्हा परिषदेत राबवून कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह आता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे. 

जिल्हा परिषद युनियननेचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंखे म्हणाले, जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण सापडू लागल्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. अत्यावश्‍यक कामे असणाऱ्यांनाच जिल्हा परिषदेत बोलवावे. 

जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे म्हणाले, अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदेचा कणा आहेत. हा कणा निरोगी राहण्यासाठी सर्वांनाच वर्क फॉर्म होम करण्याची जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने परवानगी द्यावी. तसेच महत्वाची कामे असणाऱ्यांनाच कामावर बोलवून घ्यावे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची संधी द्यावी. 

नगर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून नगर पंचायत समितीचे कामकाज दोन ते तीन दिवस बंद ठेवावे, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र त्यांना कोणी तरी वेगळेच सांगितल्यामुळे त्यांनी कामकाज सुरु ठेवले. त्यातच एक कोरोनाबाधीत पंचायत समितीत आढळून आलेला आहे. या प्रश्‍नी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image