.... या टोळीविरुद्ध कृषी विभाग झालाय सज्ज 

सतीश वैजापूरकर 
बुधवार, 27 मे 2020

मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या विदर्भातील मोरशी तालुक्‍यात टोळधाडीने उच्छाद मांडला. मोठ्या प्रमाणावर पिके फस्त केली. त्यामुळे राज्यातील कृषी विभाग सतर्क झाला. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने काल (सोमवारी) राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयासह विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र धाडले.

शिर्डी ः मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या विदर्भातील मोरशी तालुक्‍यात टोळधाडीने उच्छाद मांडला. मोठ्या प्रमाणावर पिके फस्त केली. त्यामुळे राज्यातील कृषी विभाग सतर्क झाला. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने काल (सोमवारी) राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयासह विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र धाडले. त्यात या वाळवंटी टोळधाडीच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन कसे करायचे, याबाबतची तांत्रिक माहिती आहे. शेतात टोळधाडीतील नाकतोडे आढळून आल्यास तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन आज कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले. 

हेही वाचा अरे देवा... नगर शंभरीकडे, कोरोनाबाधितांचा सिलसिला सुरूच 

टोळधाडीचा उच्छाद सुरू असलेला अमरावती जिल्ह्यातील मोरशी तालुका नगर जिल्ह्यापासून सुमारे 500 किलोमीटरवर आहे. टोळधाडीचा वेग लक्षात घेता, हे अंतर फार नाही. तथापि, ही टोळधाड नगर जिल्ह्यात येईलच, असेही नाही. खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांना सतर्क करण्यात येत आहे. मोठे आवाज करून टोळधाड हुसकावून लावणे किंवा औषधे मारून ती नष्ट करण्याच्या उपाययोजना नक्की केल्या आहेत. 

आवश्‍य वाचा कोरोनाग्रस्ताचा नातेवाईकच मटका बुकी... चिठ्ठीसोबत 

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी पाठविलेल्या माहितीनुसार, आपल्याकडे 1926 ते 32 आणि नंतर 1949 ते 55 या कालावधीत या किडीने बऱ्याच जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान केल्याची नोंद आहे. त्यानंतर 1978 व 1993 या वर्षांत काही जिल्ह्यांत ही कीड आढळून आली. या टोळधाडीतील कीटकांना वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा असे संबोधले जाते. हलकी व वाळूमिश्रित जमीन आणि पाणी उपलब्ध असेल, तर मोठ्या प्रमाणात अंडी घालून या किडीचा झपाट्याने विस्तार होतो. वाळवंटातील हिरवळ काही क्षणात नष्ट करण्याची शक्ती या टोळधाडीत असते. मोठ्या संख्येने ही धाड आली, तर झाडांना पानेदेखील शिल्लक राहत नाहीत. आजही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यात या किडीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. 
तथापि, नगर जिल्ह्यात वाळूमिश्रित हलकी जमीन कमी आहे. तुलनेत नदीकाठी काळी कसदार किंवा पोयट्याची जमीन आहे. त्यामुळे आपल्याकडे या किडीने नुकसान होण्याची शक्‍यता फार कमी आहे. मात्र, तरीही शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. 

हेही वाचा नगरमधील व्यापाऱ्यांसाठी आहे "गुड - न्यूज' 

टोळधाडीबाबत सतर्क करणारे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे पत्र आजच मिळाले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गडबडून जाण्याचे कारण नाही. येथील भूरचना या किडीसाठी अनुकूल नाही. टोळधाडीचे नियंत्रण करण्याचा प्रदीर्घ अनुभव विदर्भातील यंत्रणेला आहे. त्याआधारे कृषी विभागाने उपाययोजना निश्‍चित केल्या आहेत. टोळधाड कुठेही आढळून आली, तर शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायकांना त्याची माहिती तातडीने द्यावी. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जिल्ह्यात कुठेही या टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसलेला नाही. 
- सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Department of Agriculture ready against locusts