'साहेबां'च्या नातेवाईकांची भंडारदऱ्यावर धिंगाणा; पोलिसांनी लक्ष न दिल्यास सरपंचाचा राजीनामा देण्याचा इशारा

शांताराम काळे
Sunday, 23 August 2020

देशामध्ये कोरोना महामारीचे संकट असताना सरकारने महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी केली आहे.

अकोले (अहमदनगर) : देशामध्ये कोरोना महामारीचे संकट असताना सरकारने महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी केली आहे. असे असताना देखील भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरु असून या संदर्भात प्रशासनाला वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. 

पोलिसांकडे कर्मचारी अपुरे असून मुंबई, पुणे, नगर, नाशिक येथील वाहनांवर पोलिस, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, प्रेस, आर्मी, भारतीय उद्योग, जीवनावश्यक पुरवठा, व्हीआयपी, लोकप्रतिनिधी आदीचे स्टीकर लावून बिनधास्तपणे गाड्या भंडारदरा व घाटघर परिसरात फिरत आहेत. काही हॉटेल उघडी असल्याने पर्यटक मद्यधुंध होऊन रस्त्यवर नाचताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मोटरसायकल शेकडो तसेच रस्त्यावर गाड्यांची गर्दी तर तरुणाई धबधब्याजवळ गर्दी करत रिमिक्सच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. भंडारदरा येथील सरपंच पांडुरंग खाडे यांनी याबाबत पोलिस, महसूल विभाग, जिल्हा प्रशासन यांचे लक्ष्य वेधले आहे. 
पर्यटक पोलिस व पुढारी, अधिकारी आपले नातेवाईक असून आपलेकुणी काही करीत नाही. या पद्धतीने वागत असून धारण परिसरातही कर्मचारी नसल्याने व सीसीटीव्ही बंद असल्याने मगरूरपणा वाढला आहे. या लोकावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असे भंडारदऱ्याचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

लेखी निवेदन पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, पोलिस, तहसीलदार यांना दिले आहे. जिल्हाधिकारी यांना ई- मेलद्वारे पाठविले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास कोरोना कमिटीचा राजीनामा देणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

भंडारदरा येथील वन विभागाच्या गेटवर संगमनेर येथील काही पर्यटक कर्मचाऱ्यावर दादागिरी करत होते. साहेबाना फोन लावून दे मी कोण आहे माहित आहे का आम्हाला घाटघरला जायचे आहे. तर पोलिस यंत्रणा कमी असल्याने प्रत्येकांनी काही पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे काही वेळ वातावरण संतप्त झाले होते. मात्र पर्यटक बेफान होत धबधब्याजवळ उभे राहून ओरडतात.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite the ban on Bhandardara dam in Akole taluka the crowd of tourists