esakal | २००८ पासून पशुवैद्यकीय केंद्रांची स्थापनाच नाही; 181 प्रस्ताव लाल फितीत
sakal

बोलून बातमी शोधा

Despite giving 181 proposals in Nagar district no veterinary center has been established

राज्यात दिवसेंदिवस पशुधन वाढत असले, तरी त्या तुलनेत दवाखाने मात्र वाढत नसल्याची शोकांतिका कृषिप्रधान देशातील प्रगत महाराष्ट्रात आहे.

२००८ पासून पशुवैद्यकीय केंद्रांची स्थापनाच नाही; 181 प्रस्ताव लाल फितीत

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : राज्यात दिवसेंदिवस पशुधन वाढत असले, तरी त्या तुलनेत दवाखाने मात्र वाढत नसल्याची शोकांतिका कृषिप्रधान देशातील प्रगत महाराष्ट्रात आहे. राज्यात 2008पासून नव्याने एकाही पशुवैद्यकीय केंद्राची स्थापना झाली नाही. आहे त्या दवाखान्यांतूनच पशुधनावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात केवळ 216 पशुवैद्यकीय केंद्रांतून पशुधनावर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात नव्याने 181 पशुवैद्यकीय केंद्रे सुरू करावीत, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत पाठपुरावा सुरू असला, तरी प्रस्ताव सध्या राज्य पातळीवर लाल फितीत अडकले आहेत. 

जिल्ह्यातील मोठ्या संख्येने असलेल्या पशुधनाला 216 दवाखान्यांमार्फत आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या दवाखान्यांची संख्या वाढवावी, यासाठी जिल्हा परिषदेचा पाठपुरावा सुरू आहे. आजअखेर एकूण 181 दवाखान्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहेत. मात्र त्यांना अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने, आहे त्याच कर्मचाऱ्यांद्वारे पशुधनांवर उपचार केले जात आहेत. 

नियमित उपचारांबरोबर लसीकरणाची मोहीमही राबविण्यात नगर जिल्हा परिषदेची आघाडी कायम आहे. पावसाळ्यात उद्‌भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात घटसर्प, फऱ्या आदी आजारांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र पशुवैद्यकीय केंद्रे आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे काम करताना ताण सहन करावा लागल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. 

श्रेणी दोनच्या एकमधील रूपांतराची प्रतीक्षा 
श्रेणी दोनच्या दवाखान्यांचे रूपांतर श्रेणी एकमध्ये करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यातील श्रेणी दोनच्या 55 दवाखान्यांचे रूपांतर श्रेणीत एकमध्ये करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

दवाखान्याच्या निर्मितीची अट 
डोंगरी भागात तीन हजार पशुधनामागे एक दवाखाना व सर्वसाधारणमध्ये पाच हजार पशुधनामागे एक दवाखाना, अशा निकषाने पशुधन दवाखान्यांची निर्मिती केली जाते. 

...तर मवेशीतील म्हैस वाचली असती 
मोठ्या अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय केंद्रांची गरज आहे. अकोले तालुक्‍यातील मवेशी या मोठ्या आणि वाड्या-वस्त्यांनी वेढलेल्या गावात काही दिवसांपूर्वी साप चावून म्हशीचा मृत्यू झाला. या म्हशीला वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित ती वाचली असती आणि संबंधित शेतकऱ्याचे नुकसान टळले असते. त्यामुळे मवेशीसह तालुक्‍यातील मोठ्या गावांमध्ये पशुवैद्यकीय केंद्रे तातडीने सुरू करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top