Photo : निसर्गरम्य परिसराने घातली पर्यटकांना भुरळ; 'यशवंत' व वन विभागाचे किमया 

सुनील गर्जे 
Monday, 12 October 2020

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने विकासासाठी दत्तक घेतलेल्या आदर्श ग्राम मोरया चिंचोरे (ता. नेवासे) येथील सुपाता व मानबाई डोंगर व जंगल परिसरातील वनराईने हिरवा शालु परिधान केला असून सध्या या निसर्गरम्य परिसरात  वन्यपशु-पक्षांचा  मुक्तसंचार  सुरू आहे.

नेवासे (अहमदनगर) : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने विकासासाठी दत्तक घेतलेल्या आदर्श ग्राम मोरया चिंचोरे (ता. नेवासे) येथील सुपाता व मानबाई डोंगर व जंगल परिसरातील वनराईने हिरवा शालु परिधान केला असून सध्या या निसर्गरम्य परिसरात  वन्यपशु-पक्षांचा  मुक्तसंचार  सुरू आहे. गेल्या चार-पाच वर्षांत मोरया चिंचोरेच्या  निसर्गरम्य परिसराने नगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यातील पर्यटकांनां भुरळ घातली आहे. 

मानवी आक्रमणामुळे वन्यपशूंच्या  रहिवासात अडथळा येत असल्याची बहुतांशी उदाहरणे यंदा कोरोनामुळे अपवाद ठरली आहेत. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सर्व  पर्यटनस्थळे व जंगलसफरीचीही टाळेबंदी असल्याने प्राण्यांना मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आहे.   

यश ग्रुपचे अध्यक्ष युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांच्या नेतृत्वाखाली दत्तक ग्राम मोरया चिंचोरे हे  नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपुल पासून वांजोळी मार्गे अवघ्या पाच तर घोडेगाव येथून नऊ  किलोमीटर अंतरावर  आहे. पाचशे एकराने बेतलेल्या येथील  जंगल परिसरात सुमारे आडीचशेपेक्षा जास्त प्रजातीच्या  दाटवृक्षराजी सोबतच दुर्मिळ वनस्पतींनी बेतलेला आहे.  जंगल परिसराला नैऋत्य दिशेस  पश्चिम-दक्षिण बाजूस  सुपाता व मानबाई डोंगररांगांची तटबंदी आहे. त्यातच डोंगररांमधून वाहत येणारे  छोट्या-मोठ्या ओढे-नाल्यांसह  छोट-छोटे धबधब्यांनी पावसाळ्यात या परिसराचे सौदर्य आणखीच खुलवले आहे. 

'यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व वन विभाग यांच्या माध्यमातूनच मोरया चिंचोरे गाव व येथील जंगल परिसराचा कायापालट झाला असून येथे  एक मोठा माती तलाव, दोन सिमेंट बंधारे, पाच छोटे माती  बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाळ्यात येथील  पशु-पक्षांसाठी पाच कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करण्यात असली आहे. 
मोरया चिंचोरे 'वन संपदा' दृष्टिक्षेपात...

या जंगल परिसरात अडीचशे पेक्षा जास्त प्रजाती झाडे झडपे व गवत,  शंभर  पेक्षा जास्त प्रजातीचे प्राणी, पस्तीस पेक्षा जास्त प्रजातीचे सरपटणारे प्राणी, पासष्ठ पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी, शंभर पेक्षा जास्त प्रजातीचे किटक व चाळीस पेक्षा जास्त प्रजातीचे फलपाखरे अशी वन संपदा आहे.  

अशी माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक प्रा. योगेश जाधव व बाबासाहेब दराडे  यांनी दिली.

"निसर्ग संवर्धन,  पशु-पक्षी व वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास निर्माण करणे यासह  गेल्या चार-पाच वर्षांत मोरया चिंचोरे येथे मोठ्या संख्येने येत असलेले  निसर्ग, पशु-पक्षी व वन्यजीव अभ्यासक, निरीक्षक आणि  दिवसेंदिवस वाढते  पर्यटक यांच्यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व वन विभागाच्या माध्यमातून  याभागात सोय-सुविधा लवकरच उपलब्ध करणार आहोत.

-प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development of Morya Chinchore Forest by Yashwant Social Foundation