देवगडला दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ, यात्रा मात्र रद्द

सुनील गर्जे
Friday, 25 December 2020

गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी सुरू केलेला श्री दत्त जन्मोत्सव आजही त्यांनी घालवून दिलेल्या नियमानुसार परंपरेने सुरू आहे.

नेवासे : तालुक्‍यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सवास सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाने प्रारंभ झाला. उत्सवानिमित्त मुख्य दत्त मंदिरासह सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. 

गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी सुरू केलेला श्री दत्त जन्मोत्सव आजही त्यांनी घालवून दिलेल्या नियमानुसार परंपरेने सुरू आहे. बुधवार (ता.23) ते बुधवार (ता. 30) डिसेंबर पर्यंत श्री दत्त मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण फक्त दहा भाविकांच्या उपस्थितीत झाले.

या दरम्यान पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, रात्री वीस ते पंचवीस भाविकांच्या उपस्थितीत किर्तनाचा कार्यक्रम होत आहे. दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासन व प्रशासन यांनी घालवून दिलेल्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने दत्तजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थानने घेतला असून नेहमी होणारे अन्नदान कार्यक्रम ही रद्द करण्यात आलेले. मंगळवार (ता. 29) डिसेंबर रोजी दत्त मंदिरात मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा होणार आहे. 
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यात्रा रद्द असल्याने कोणत्याही व्यावसायिकांनी देवगड येथे दुकाने आणण्याचा प्रयत्न करू नये, सर्व भाविक भक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व देवस्थानच्या आवाहनस प्रतिसाद देऊन सहकार्य करावे. 

- गुरुवर्य भास्करगिरी महाराज. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devgad starts Datta Jayanti celebrations