श्रीगोंद्याचा "बाजार" गरम ः धनसिंग भोईटे यांनी उतरविला मुकूट, आता विरोधकांचा फाडणार बुरखा

Dhansingh Bhoite resigns
Dhansingh Bhoite resigns

श्रीगोंदे : बाजार समितीचे सभापती धनसिंग भोईटे यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी असतानाही, त्यांना पावणेचार वर्षे सह्यांचे अधिकार नव्हते. नेत्यांनी त्यांना नामधारी सभापती बनवले होते. भोईटे यांनी राजानीमा देतानाच, नवा सभापती निवडताना उपसभापती वैभव पाचपुते यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगत, भावी राजकारणाचे संकेत दिले. 

"असून सत्ताधारी, सभापती नामधारी' या मथळ्याखाली "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करीत बाजार समितीचे सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. त्यानुसार भोईटे यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे सुपूर्द केला.

घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामापत्रात नमूद केले असले, तरी खरे राजकारण लपून राहिलेले नाही. बाजार समितीत भाजपची सत्ता आहे. 

आमदार बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांच्या एकीची सत्ता आहे. मात्र, तरी भोईटे यांच्याऐवजी उपसभापती पाचपुते यांच्याकडे सह्यांचे अधिकार ठेवले होते. त्यामुळेच भोईटे यांनी पद सोडताना, समितीत सत्ताबदल करण्याची भूमिका मांडल्याने राजकारण तापले आहे. 
"सकाळ'शी बोलताना भोईटे म्हणाले, ""नामधारी पद किती दिवस ठेवणार? सभापती असलो, तरी समितीच्या कारभारात कसलाही हस्तक्षेप केला नाही. सभापतिपद नावाला ठेवण्याऐवजी ते सोडण्याची इच्छा झाली आणि राजीनामा दिला. समितीतील एकाधिकारशाही पाहवत नाही. अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले. काहींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सगळाच बदल करू, असे समविचारी संचालकांनी ठरवले आहे. त्यामुळे आपण पद सोडले. नवा सभापती निवडताना, उपसभापती बदलासाठी सगळेच संचालक एकत्र आहेत.'' 

..म्हणून संचालकांची एकजूट 
भोईटे म्हणाले, ""सध्या लिंबाचा विषय गाजत आहे. सह्यांचे अधिकार असणारे लोक त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे भासवित आहेत. त्यातून आम्ही त्यांना टार्गेट करीत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात टाकल्या जात आहेत. ही निव्वळ दिशाभूल आहे. आता कळवळा आणणारे पूर्वी कुठे होते? त्यांच्याच ताब्यात सत्ता होती. बाजार समितीतील सगळ्या घडामोडींची चौकशी होऊन दोषींचे पितळ उघडे पाडण्यासाठी संचालकांची एकजूट झाली आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com