esakal | भटक्या समाजाची उंचावली मान...धनुषाने आश्रमशाळेत राहून मिळवला प्रथम क्रमांक...
sakal

बोलून बातमी शोधा

dhanusha nagar

धनुषाने दहावीच्या परिक्षेत ४४० गुण (८८ टक्के) मिळवित आश्रमशाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस किंवा शहरासारख्या सुविधा नसतानाही मिळवलेले ८८ टक्के गुण महत्त्वाचे आहेत.

भटक्या समाजाची उंचावली मान...धनुषाने आश्रमशाळेत राहून मिळवला प्रथम क्रमांक...

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (नगर) : भटका समाज हा नेहमीच भटकंती करताना दिसतो. यामुळे मतदार यादीतील नोंदणी, रेशन कार्ड, आधार कार्ड आदी शासकीय सुविधांपासून आणि मुख्य म्हणजे शिक्षणापासून हा समाज नेहमीच वंचित राहिलेला आहे. शाळेत मुलांना घालायचे तर इतरांचा त्यांच्याकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टीकोन असतो. मात्र आपली ही मुले शिकली पाहिजेत, समाजात त्यांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे. म्हणून कोळगाव (ता.श्रीगोंदा) येथील मिनास काळे यांनी आपल्या अनुषा व धनुषा या दोन्ही मुलींना दर्जेदार शिक्षणासाठी सहा वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आश्रमशाळेत दाखल केले.

आज त्यांच्या या कार्याचे चीज झालेले दिसत असून धनुषाने दहावीच्या परिक्षेत ४४० गुण (८८ टक्के) मिळवित आश्रमशाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस किंवा शहरासारख्या सुविधा नसतानाही मिळवलेले ८८ टक्के गुण महत्त्वाचे आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ढवळपुरी आश्रमशाळेचा निकाल ९९ टक्के लागला असून यात धनुषा काळे, सुजित वाव्हळ, राहुल राठोड व वेदांत बुचडे या चौघांनी ८८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

प्राथमिक आश्रमशाळेतील शिक्षणानंतर माध्यमिकचे शिक्षणही आपल्या मुलींनी माध्यमिक आश्रमशाळेतच घ्यावे, असे पालकांनी ठरवले. पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलींनीही त्यांची जाण ठेवून अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळविले.

धनुषाने मागील दोन वर्षांपासून किक बॉक्सिंग, हाफकिडो, ओशो यासारख्या विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्हा, विभाग व राज्य पातळीपर्यंत यश मिळविले आहे. आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना त्यांना शाळा प्रशासनाने नेहमीच सहकार्य केले. ढवळपुरी येथील आश्रमशाळेत या समाजाचे २५ ते ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सईद काझी यांनी तिचे अभिनंदन केले.

मिनास काळे म्हणाले, आमच्या भटक्या समाजातील लोकांमध्ये शिकण्याबद्दल आवड नाही. पण माझी मुले शिकत आहेत, म्हणून मी माझा मुलगा व दोन्ही मुलींना ढवळपुरी आश्रमशाळेत पाठवले होते. तिन्ही मुलांनी दहावीला खूपच चांगले मार्क मिळवले. धनुषा तर पहिला नंबर मिळवल्याने खूपच आनंद झाला.

संपादन - सुस्मिता वडतिले