समृद्धी महामार्गांवर डिझेल चोरणारांची टोळी चोवीस तासांत गजाआड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

पोलिसांच्या माहितीनुसार, कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आलेली वाहने उभी केली जातात.

कोपरगाव : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या वाहनांमधील डिझेल चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी चोवीस तासांत गजाआड केले. 

अमोल मच्छिंद्र आहेर (रा. वाकडी, ता. राहाता), चेतन अरविंद गिरमे (रा. धारणगाव, ता. कोपरगाव), राजीवसिंह रामअसरेसिंह (रा. उत्तर प्रदेश), अंगदकुमार रामपाल बिंद (उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 36 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यात पिक-अप, बॅरलमध्ये चोरलेले डिझेल व अन्य साहित्याचा समावेश आहे.

हेही वाचा - नगरचे नेते सेटलमेंटवाले, विखेंनी फोडला बॉम्ब 

पोलिसांच्या माहितीनुसार, कोकमठाण शिवारातील रक्ताटे वस्ती परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आलेली वाहने उभी केली जातात. मंगळवारी (ता. 16) पहाटे चोरांनी या वाहनांतून एक लाख 13 हजार 200 रुपये किमतीचे 1140 लिटर डिझेल, तसेच वाहनाच्या बॅटऱ्या, सेल्फ स्टार्टर, बॅटऱ्यांच्या केबल, असा मुद्देमाल लांबविला.

या बाबत विक्रांत राजेंद्र सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, विभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली. या पथकाने अवघ्या 24 तासांत वरील चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel thieves arrested in 24 hours