
24 फेब्रुवारी 2016 रोजी 20 लाख रुपयांचा पहिला व त्यानंतर काही दिवसांनी दुसरा अशा दोन धनादेशाद्वारे 40 लाख रुपये अदा केले होते.
संगमनेर ः शहरानजीकच्या गुंजाळवाडी शिवारातील जमिनीच्या व्यवहारापोटी धनादेशाने दिलेले 40 लाख रुपये परत मागणाऱ्या डॉक्टरची आर्थिक फसवणूक करुन दमदाटी केली. या प्रकरणी डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांच्या फिर्यादीवरुन एका कुटूंबातील पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, शहरातील डॉ. योगेश गेठे यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये प्रशांत प्रकाश झावरे यांच्या मालकीच्या, गुंजाळवाडी शिवारातील गट क्रमांक 45 मधील 10 गुंठे जागा खरेदीचा व्यवहार केला होता. यापोटी 24 फेब्रुवारी 2016 रोजी 20 लाख रुपयांचा पहिला व त्यानंतर काही दिवसांनी दुसरा अशा दोन धनादेशाद्वारे 40 लाख रुपये अदा केले होते.
ही रक्कम हाती आल्यानंतरही जागा मालक प्रशांत प्रकाश झावरे, वनिता प्रशांत झावरे, प्रवीण प्रकाश झावरे, प्रकाश कोंडाजी झावरे व शारदा प्रकाश झावरे ( सर्व रा. घोडेकर मळा, संगमनेर ) यांनी ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला नाही किंवा गेठे यांना जमिनीची कागदपत्रे दिली नाहीत तसेच खरेदीखतही केले नाही. त्यामुळे गेठे यांनी व्यवहारापोटी दिलेली आगाऊ रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला होता.
या दरम्यान प्रशांत, वनिता व प्रविण झावरे यांनी डॉ. गेठे यांना दिलेले धनादेश खात्यात रक्कम नसल्याने बाऊंस झाले. त्यामुळे डॉ. गेठे यांनी या प्रकरणी न्यायालयातून पैसे परत करण्याचे आदेश मिळवले असता, त्यालाही झावरे कुटूंबियांनी दाद दिली नाही. त्यामुळे गेठे यांनी त्यांच्याविरोधात आर्थिक फसवणूकीची फिर्याद दिली.
पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.