esakal | डॉक्टर, नर्स, पोलिस, अधिकाऱ्यांप्रमाणे प्रत्येक शेतकरी कोरोना योद्धाच! 
sakal

बोलून बातमी शोधा

Like the doctors who served in the lockdown the farmer was a Corona warrior

कोरोना विषाणूचे संकट आले आणि काही समजून घ्यायच्या आत देशात लॉकडाउन झाले.

डॉक्टर, नर्स, पोलिस, अधिकाऱ्यांप्रमाणे प्रत्येक शेतकरी कोरोना योद्धाच! 

sakal_logo
By
सूर्यकांत नेटके

अहमदनगर : कोरोना विषाणूचे संकट आले आणि काही समजून घ्यायच्या आत देशात लॉकडाउन झाले. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्‍टर, नर्स, पोलिस, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी असे अनेक योद्धे पावलोपावली लढले. या लढ्यात सरकारी यंत्रणेप्रमाणेच पोशिंदा शेतकरीही मागे नव्हता. 

संकटात उपासमार होऊ नये म्हणून जीव धोक्‍यात घालून त्यांनी भाजीपाला, फळे, अन्नधान्य थेट घराघरांपर्यंत पोच केले. गरीब घरातली माणसे उपाशी राहू नयेत म्हणून कोणी अन्नछत्र उघडले, तर कोणी आपले शेतच लोकांसाठी खुले केले. स्वतः संकटाशी सामना करताना दातृत्व निभावणारे कित्येक शेतकरी या राज्याने, देशाने पाहिलेत. संकटात लढणारे शेतकरी म्हणतात, की कोणतेही संकट येवो; पहिला घाव शेतकऱ्यांवर पडतो. शेती उद्‌ध्वस्त होते. दुष्काळ असो नाही तर अतिवृष्टी, वादळ असो, कोणतीही साथ असो; आम्ही तर अशा प्रत्येक संकटाशीच लढणारे योद्धेच आहोत. शेतकऱ्यांचा संघर्ष समाजानेही वेळोवेळी पाहिलाय, अनुभवलाय. 

तीन महिन्यांपूर्वी देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे संकट आले. संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने पूर्णतः लॉकडाउन केले. त्यामुळे अचानक, अनपेक्षितपणे सगळेच ठप्प झाले. संकटाशी मुकाबला करत लोकसेवा करणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी वगळले, तर साधारणपणे दोन महिने सारी माणसे घरातच बसून होती. संकटांशी सामना करत, संसर्ग वाढू नये म्हणून पोलिस, डॉक्‍टर, नर्स, महसूलसह सर्वच विभागांतील सरकारी अधिकारी, कर्मचारी उपाययोजना करताना राबत होते. संकटाशी मुकाबला करत काम करणाऱ्या या साऱ्यांना लोक योद्धे म्हणतात. गंभीर संकटाशी सामना करत काम करणारे ते आहेतही योद्धे.

मात्र, सरकारी यंत्रणेसोबत प्रामुख्याने काम करणारा अजून एक घटक आणि त्या घटकातील बहुतांश माणसे ही सरकारी यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती, ती म्हणजे शेतकरी. कोरोनाच्या संकटात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून तरी कोणी योद्धा म्हटले नाही तो भाग वेगळा; पण "बंद'च्या काळात उपासमार होऊ नये म्हणून जीव धोक्‍यात घालून भाजीपाला, फळे, अन्नधान्य त्यांनी थेट घराघरांपर्यंत पोचविले. गरीब घरातली माणसे उपाशी राहू नयेत म्हणून कोणी अन्नछत्र उघडले, तर कोणी आपले शेतच लोकांसाठी खुले केले. स्वतः संकटाशी सामना करताना दातृत्व निभावणारे कित्येक शेतकरी या राज्याने, देशाने पाहिलेत. 

लॉकडाउनचा काळ आता संपल्यासारखा झालाय. खरिपाची पेरणी सुरू झालीय. उन्हाळ्यात शेतीचे झालेले नुकसान जणू विसरून शेतकरी नव्याने शेतशिवारात उत्साहाने कामाला लागले आहेत. कोरोना संकटाबाबत मोकळेपणाने बोलत आहेत. 

कोरोना काळात नगर बाजार समितीत एका शेतकऱ्याशी चर्चा केल्यावर तो बोलला. "संकटाची प्रत्येकालाच भीती असते; पण आम्ही लाकडाउनच्या काळात कशाचीही विचार केला नाही. नफा मिळतो की तोटा होतो, याचा विचार न करता राहुरीच्या बाजारात भाजीपाला, मिरची विकली. लोकांची गरज भागणे गरजेचे, एवढेच पाहिले. खरं तर लोकांची भूक भागावी म्हणून काम करताना दातृत्वाची भावना असावी. शेतकरी हा देशाचा दाता आहे. स्वतः उपाशी असला तरी तोच लोकांची भूक भागवू शकतो. त्याच्यात तेवढे दातृत्व निसर्गानेच दिलेय. संकटात आम्ही आमची जबाबदारी पार पाडली.' 

जामखेड तालुक्‍यातील शिऊरच्या शेतकऱ्याने आपली पेरूची बाग लोकांसाठी खुली केली होती. संपूर्ण शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला विकणाऱ्या ज्योती भापकर यांनी संकट काळात नफा-तोट्याचा विचार न करता, ज्या काळात पुण्या-मुंबईतून लोक बाहेर पडत होते, त्या काळात भाजीपाला पुरविला. अनेक शेतकऱ्यांना धान्य, फळे, भाजीपाला पुरवठा करताना कोरोनाची बाधाही झाली. नेवासे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात, "हवी ती फळे न्या' अशी ऑफर देऊन फळांची "ना नफा- ना तोटा' तत्त्वावर विक्री केली. खरं तर कोरोनाचे संकट प्रत्येकावरच होते. मात्र, त्यावर मात करत लोकांसाठी काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची उदाहरणे समाजाने पाहिली आहेत.

शेवगावच्या वाघोलीतील शेतकरी गटाने स्वतःच्या शेतातील भाजीपाला गरजू लोकांना, गरीब वस्तीत मोफत दिला. ठासून काम करणारे शेतकरी म्हणतात, कोरोना हे एक संकट होते. अशी कितीतरी संकटे शेतकऱ्यांनी पेललीत. समाजानेही ते पाहिलेय. रोजगाराच्या शोधात माणसं देशाच्या कानाकोपऱ्यांत जातात; मात्र कोरोना नावाच्या संकटाने लाखो मजूर, गरीब कुटुंबाचे जगणे अवघड झाले होते. रोजगार बंद झाला. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांची जगण्याची भ्रांत निर्माण झाली होती. यासाठी अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते पुढे आले.

औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मोफत किराणा, औषधांचे वाटप केले, रोजगार बंद झाल्याने मध्य प्रदेशातील पायी परतणाऱ्या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली. गोरगरीब, विकलांग, मनोरुग्ण, भिक्षेकऱ्यांना अन्नाची पाकिटे वाटली. त्यात शेतकरी अग्रेसर होते. खरं तर कोरोनाचाच काय, इथं प्रत्येक संकटाचा पहिला घाव शेती आणि शेतकऱ्यांवर पडतोय. तसाच घाव कोरोनाचाही पडला. अनेक शेतकऱ्यांचे या संकटाने आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले; मात्र हे संकट झेलून इतरांसाठी धैर्याने लढणारा शेतकरीच मोठा योद्धा आहे आणि सगळ्याच संकटात तो योद्धाच राहणार आहे! 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image